महसूल,पोलीस,वन विभाग,मावळचे लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रतिनिधी यांनी व्यावसायिकां सोबत जूनपूर्वी बैठक घेऊन नियोजन करावे-निखिल कवीश्वर



मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरावर प्रशासन गेल्या दोन तीन वर्षांपासून गदा आणत आहे. दरवर्षी जून ते डिसेंबर हा मुख्य पर्यटन हंगाम असतो आणि याच कालावधीत होणाऱ्या व्यवसायावर स्थानिक नागरिकांचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते . परंतु मागील काही वर्षांत विविध कारणांमुळे पावसाळ्यात पर्यटकांसाठी पर्यटन स्थळे आणि त्याठिकाणी जाणारे रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. याचा गंभीर परिणाम स्थानिक व्यावसायिकांवर होत असून,तसेच पर्यटकांची संख्याही घटत आहे.पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट येणार नाही. यात महसूल विभाग, पोलीस यंत्रणा, वन विभाग आणि मावळचे लोकप्रतिनिधी-आमदार व खासदार यांनी स्थानिक प्रतिनिधी आणि व्यावसायिकांसोबत जूनपूर्वी बैठक घेऊन योग्य नियोजन करावे, अशी मागणी लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात शासकीय यंत्रणांना निवेदने देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि लोणावळा शहर काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष निखिल कवीश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला निखिल कवीश्वर यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण आंबेकर, राजू गवळी, हाजी अब्बास खान, कम्मूभाई जसदनवाला, प्रवीण वर्तक, सुधीर शिर्के, फिरोज बागवान, जाकीर शेख, श्री. मानकर, संजय तळेकर, सुनील मोगरे, रवी सलोजा, मन्सूर मन्यार, रियाज मन्यार, मनीष गवळी आदी उपस्थित होते.लोणावळा शहराच्या हितासाठी काँग्रेस कमिटी जागरूक नागरिक मंच बरोबर आहे.असेही कवीश्वर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.टपऱ्या विषयी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे काँग्रेस गरीब व छोट्या व्यवसायिकांच्या हक्कांसाठी कटिबद्ध असून, त्यांच्या उपजीविकेवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही.पण लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीला अडथळा आणि बेकायदेशीर गीष्टीना काँग्रेस चा विरोध असल्याचे स्पष्ट मत निखिल कवीश्वर यांनी पत्रकार परिषदेत मांडले




