“जिद्द,मेहनत,चिकाटीच्या जोरावर शेतकरीचा मुलगा जेव्हा सी ए होतो!वृषभ राजेंद्र जाधव यांना सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश!







मावळ मराठा न्युज -लोणावळा, “जिद्द,मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतीही शिखरे गाठता येतात,”हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे रायगड जिल्ह्यातील वळवण गावचे सुपुत्र वृषभ राजेंद्र जाधव यांनी. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पार करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.वृषभ यांचे वडील राजेंद्र जाधव हे एक साधे शेतकरी असून, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी असूनही शिक्षणाची ओढ आणि प्रगतीची भूक त्यांच्यात लहानपणापासून होती. त्यांच्या शिक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती त्यांच्या चुलत्यांनी – आनंद जाधव यांनी. वृषभमधील गुणवत्ता ओळखून त्यांनी त्याला गावातून लोणावळ्यात आणले आणि संपूर्णपणे शिक्षणासाठी पाठबळ दिलं. कोणत्याही परिस्थितीत वृषभच्या मागे ठामपणे उभं राहत त्यांनी त्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि आधार दिला.वृषभ यांनी VPS हायस्कूल, लोणावळा येथून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. ते लहानपणापासूनच अभ्यासू, शांत स्वभावाचे आणि एकाग्र होते. त्यांनी १०वी आणि १२वी या दोन्ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केल्या.आपल्या चिकाटी,मेहनत आणि कुटुंबाच्या पाठिंब्यावर त्यांनी सीए परीक्षेतही यश मिळवत गाव कुसाबाहेर येण्याचे स्वप्न साकार केले. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण भांगरवाडी परिसर, शाळा,आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट,कुटुंबाचं प्रोत्साहन,गुरुजनांचे मार्गदर्शन आणि विशेषतः आनंद जाधव यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. “शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. माझे स्वप्न साकार झाले आहे. यशामागे माझ्या कुटुंबाचा पाठिंबा आणि गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले,” असे भावनिक उद्गार वृषभ यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना व्यक्त केले. वृषभ जाधव यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!त्यांची ही यशोगाथा अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी स्तंभ ठरेल आणि “शिकण्याची उमेद” नव्याने जागवेल!. मावळ मराठा न्युज परिवाराच्या वतीने वृषभ यास पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.




