*लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील सर्व शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ मुळे देश भक्तिमय वातावरण*







मावळ मराठा न्युज -लोणावळा,शासन आदेशानुसार २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार लोणावळा नगरपरिषदेतर्फे “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” हा नारा देत स्वच्छता मोहिमेने अभियानाची सुरुवात करण्यात आली.या उपक्रमांतर्गत लोणावळा नगरपरिषद व INS शिवाजी नेव्हल बँड पथक यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शाळांमध्ये देशभक्तीपर संगीतवाद्य कार्यक्रम आयोजित केले जात असून, विद्यार्थ्यांना देशभक्तीविषयक मार्गदर्शन दिले जात आहे. तसेच नगरपरिषद कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना (मीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था) सहकार्य करून भारतीय जवान व पोलिसांसाठी तिरंगा राख्या तयार करण्यात आल्या.अभियानात स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. याशिवाय, मुख्याधिकारी मा. अशोक साबळे यांच्या निर्देशानुसार शहरातील सर्व शाळांना त्यांच्या स्तरावर या मोहिमेअंतर्गत उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, आवश्यक सहकार्य पुरविले जात आहे.शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चित्रकला स्पर्धा, तिरंगा राखी बनविण्याची कार्यशाळा, रांगोळी स्पर्धा, प्रभातफेरी यांसारखे विविध उपक्रम राबविले आहेत. नगरपरिषदेमार्फत तिरंगा चित्रकला स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य, तिरंगा राखी बनविण्यासाठी साहित्य, रांगोळी साहित्य तसेच प्रभातफेरीसाठी तिरंगा झेंडे पुरविण्यात येत आहेत.शाळा स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमधील प्रथम तीन विजेत्यांना (प्रत्येक शाळेनुसार) प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत.लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. अशोक साबळे यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, या राष्ट्रीय पर्वात सहभागी होऊन आपापल्या घरावर तिरंगा फडकवावा, स्वच्छतेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करावी.



