आपल्यात दडलेला कलावंत नवीन पिढी समोर आणणं अत्यंत आवश्यक -डॉ. शालिग्राम भंडारी

मावळ मराठा न्युज -तळेगाव,आपल्यात दडलेला कलावंत नवीन पिढी समोर आणणं अत्यंत आवश्यक आहे ! परीक्षेतील गुणांबरोबरच -नेत्रांना आनंद देणाऱ्या चित्रकारांच्या रंग संगतीत,नृत्याच्या तालात- कानाला सुमधुर सुरांचा आनंद देणाऱ्या गायकाच्या स्वरात- हा अविट आनंद दडलेला असतो! ही त्याने सादर केलेली गुणवत्ता त्याच्यात दडलेल्या त्या कलाकाराने अतिशय कष्टप्रद साधनेतून त्याने कमावलेली असते की जी- त्याच्या उज्वल भविष्यातील अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी महत्त्वाची ठरत असते! त्याच्यात असलेल्या विविध कलागुणांच दर्शन- शाळेने आयोजित केलेल्या-स्नेहसंमेलनातून आपल्याला घडत असतं! एवढच नव्हे तर-_ महाविद्यालयातील स्नेहसंमेलना निमित्त भरवली जाणारी विविध प्रदर्शने त्यात-रांगोळी प्रदर्शन, विविध समाजोपयोगी वस्तूंच प्रदर्शन,औद्योगिक उपकरणांच प्रदर्शन,हे सारे संस्कृतीचे मोहक इंद्रधनुष्य विद्यालय आणि महाविद्यालयाच्या आवारात आपल्याला नेहमीच दिसून येतात!

नेटक्या शब्दात सांगायचं म्हणजे ही सर्व स्नेहसंमेलन- कलावंत व रसिक श्रोते घडवणारी अत्याधुनिक प्रयोगशाळाच असते! पण आज जीव घेण्या स्पर्धेच्या युगात दुर्दैवाने- कित्येक पालक परीक्षेची भीती दाखवून मुलांना संस्कृतिक कार्यक्रमापासून वंचित ठेवतात-कारण आपल्या विद्यार्थ्यांच लक्ष आवश्यक अभ्यासापासून विचलित होऊन त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही त्याचा परिणाम होईल अशी भीती त्यांना सतत वाटत असते !पर्यायाने आपल्या लेकराला योग्य त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही हा यक्ष प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो! कदाचित काही मुलं कलावंत नसतीलही पण- ज्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात अद्वितीय कलागुण आहेत-ते जोपासणे म्हणजे एक- निकोप निरोगी आणि सुदृढ समाजाची निर्मिती करणे हे होय! दुर्दैवाने विद्यार्थ्यांची आवड विचारात न घेता पालकांच्या दबावाखाली ही मुलं मन मारून पुस्तकात डोकं खुपसून बसतात! त्यापेक्षा त्यांना नृत्याचा,गाण्याचा हसण्याचा, मैदानी खेळांचा आनंद घेऊ दिला तर ती तणावमुक्त होऊन छान पैकी खुलतील कारण शेवटी आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास या रंगभूमीवरच त्यांना मिळू शकतो! आज मुलांना समजून घेणार मन पालकांकडे असेल तर- मूलही त्यांच्या मनासारखीच घडतील! या गुणी कलावंत विद्यार्थ्यांतूनच-निकोप-सुदृढ निरोगी समाजाची निर्मिती होऊ शकेल!

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page