देहूरोड आणि कामशेत परिसरात दोन कार पलटी; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली







मावळ मराठा न्युज – (श्रावणी कामत) देहुरोड:जुना पुणे–मुंबई महामार्गावर (दि. 29) सकाळपासून दोन वेगवेगळ्या अपघातांनी दणाणून गेला. देहूरोड आणि कामशेत या दोन्ही ठिकाणी भरधाव वेगातील कार नियंत्रण सुटून पलटी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये मोठी जीवितहानी टळली.पहिला अपघात देहूरोड परिसरात पहाटे घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने रस्त्यात अचानक अडथळा आल्याने नियंत्रण गमावून पुढील वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्हीही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार दोघांची प्रकृती स्थिर आहे.दरम्यान, दुसरा अपघात कामशेतजवळील त्याच महामार्गावर मुंबईच्या दिशेने जात असताना घडला. भरधाव वेगातील कारचे अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. या घटनेत कोणतीही जखमी वा जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.दोन्ही अपघातांमुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी तातडीने उपाययोजना केल्याने परिस्थिती लवकर सामान्य झाली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी महामार्गावर वेगमर्यादा पाळण्याचे आणि दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.जुना पुणे–मुंबई महामार्गावरील वेग आणि वाहतूक वाढली असल्या मुळे धोका निर्माण होत असल्याने सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी मत व्यक्त केले आहे.



