कैवल्यधाम योग संस्थेत शताब्दी वर्षनिमित्त गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन








मावळ मराठा न्युज – (श्रावणी कामत )लोणावळा लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेत आपल्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंद जी यांच्या व्याख्यानमाला कार्यक्रमा अंतर्गत बुधवार दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी संस्थेच्या कुडीलाल सेक्सारिया सभागृहात आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक,आध्यात्मिक गुरु गव्हर्निंग कौन्सिल-इंडियन योगा असोशिएशन चे अध्यक्ष गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुदेव यांच्या आवाहाना पूर्वी कैवल्यधाम संस्थेच्या गोवर्धनदास सेक्सारिया योग महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी शांती आणि भक्तिपूर्ण वातावरणात उपस्थितांसाठी भजन आणि कीर्तन सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतीपाठाने करण्यात आली. या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी, लोणावळा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वप्रथम कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांचा संक्षिप्त स्वरूपात परिचय करून दिला आणि त्यांना शाल, कैवल्यधाम कॉफी टेबल बुक आणि कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षाची मुद्रा देऊन सन्मानित केले. यानंतर गुरुदेव यांचे सुश्राव्य व्याख्यान झाले त्यांनी भक्ती, योग आणि आध्यात्माचे महत्व पटवून दिले आणि उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नाला आपल्या भाषाशैलीत उत्तरे दिली.
“हरे रामा हरे कृष्णा” च्या जयगोषाने वातावरण मंत्रमुग्ध केले.
जगभरात आदरणीय गुरुदेव यांचे ज्ञान आणि शब्द अनेक जीवनांना प्रकाश देत आहे. कैवल्यधाम संस्थेच्या इतिहासात हा एक सुवर्णयोग आहे त्यांची दिव्य उपस्थिती लोणावळा या पवित्र शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
संस्थेकडून कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था Onsite आणि Online करण्यात आली होती. यास बहुसंख्य श्रोत्यांकडून प्रतिसाद मिळाला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी लोणावळा पोलीस यंत्रणा, लोणावळा नगरपरिषद,विद्युत महामंडळ,टाटा पॉवर हाउस यांचे विशेष सहकार्य लाभले.



