महिला तक्रारदाराचा तळेगाव दाभाडे पोलिसांवर कलमे न लावल्याचा आरोप







मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे (श्रावणी कामत) तळेगाव येथील एका शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या महिलेने जातीवाचक छळ, आर्थिक गैरप्रकार व डिजिटल छळाच्या आरोपांप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे तक्रार दिली असून, गुन्हा नोंदविताना काही महत्त्वाची कलमे वगळल्याचा आरोप तिने केला आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, संस्थेत काम करत असताना तिच्यावर जातीवाचक अपमान, पगारासंबंधी वाद तसेच डिजिटल माध्यमातून त्रास देण्यात आल्याचे प्रकार घडले. याबाबत दिलेल्या जबाबात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्याची मागणी तिने केली होती. मात्र, पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात संबंधित कलमे समाविष्ट न केल्याचा तिचा आरोप आहे.तक्रारदाराने पोलिसांच्या कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले असून, तपास निष्पक्षपणे व्हावा व आवश्यक ती कलमे जोडावीत, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा झाल्यास उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्याचा इशाराही तिने दिला आहे.दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलिसांनी सांगितले की, तक्रारीतील सर्व मुद्द्यांची चौकशी सुरू असून आवश्यक पुरावे व कायदेशीर बाबींचा विचार करून पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणामुळे शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



