*प्राधिकरणात गंगा आरती आणि गंगाकलश स्नान संपन्न*

मावळ मराठा न्युज निगडी (प्रदीप गांधलीकर) १६ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्रीनिमित्त श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी गंगा आरती आणि गंगाकलश स्नान शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाले. विधानपरिषद उपसभापती अण्णा बनसोडे, नगरसेविका शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे, श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.काशी विश्वेश्वर येथील विद्वान पंडित हिमांशू पांडे आणि गगन भार्गव यांनी केलेल्या पौरोहित्यानुसार सायंकाळी ०७:१५ वाजता गंगाआरती आणि रात्री ठीक ०८:०० वाजता गंगाकलश स्नान हे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी शंखनाद, घंटानाद करीत श्रीगणेश पूजन, शिवस्तुती, शिवस्तवन आणिधूप, दीप, कर्पूर आरतीने श्री केदारेश्वराची आरती करण्यात आली. उपस्थित असलेल्या भाविकांनी पुष्पवृष्टी करीत देवाधिकांचा जयघोष केला.याशिवाय महाशिवरात्री २०२६ या महोत्सवात रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी पहाटे पाच वाजेपासून सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी पहाटे पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये पहाटे ०५:३० वाजता रुद्राभिषेक, सकाळी ०७:३० वाजता बागलकोट कृष्णशिला इच्छाधारी नागधाम प्राणप्रतिष्ठापना व श्रीफळ जलअभिषेक, सकाळी ०८:०० वाजता आरती, त्यानंतर सकाळी ०९:३० ते ५:०० या वेळेत रक्तदान शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. त्यादरम्यान दुपारी १२:०० वाजता पवनसुत भजनी मंडळ प्रस्तुत भक्तीभजन, दुपारी ०३:०० वाजता स्वामी प्रतिष्ठान भजनी मंडळ प्रस्तुत स्वरभजन, दुपारी ०४:३० वाजता प्रसिद्ध शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणांतर्गत लाठीकाठी आणि दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सायंकाळी ०५:३० वाजता कलारंजनी संगीत विद्यालयाच्या वतीने ‘सत्यम् शिवम् सुंदरा’ हा भावगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर रात्री ०८:१५ वाजता स्थानिक कलाकारांनी भक्ती संगीतमाला सादर केली. रात्री ११:०० वाजेपासून पहाटे ०५:०० वाजेपर्यंत महाशिवरात्र जागरण करण्यात आले. चार प्रहर पूजेने महाशिवरात्री महोत्सवाचा समारोप करण्यात आला. या सर्व धार्मिक कार्यक्रमांत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page