‘आरडीडी टाॅक शो’ची हजाराव्या कार्यक्रमाकडे वाटचाल

मावळ मराठा न्यूज:-पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : २९ जानेवारी २०२३नुकताच यू ट्यूबवर एक टाॅक शो पाहण्याचा अन् ऐकण्याचा योग आला. कवयित्री मैथिली रमेश यांची मुलाखत चालू होती. निमित्त होते, मैथिलीची मूळ इंग्रजी कथा ‘ दी ब्रोकन विंडो’वरील हिंदी सिनेमाचा मुहूर्त प्रसिद्ध कवी रमेश वाकनीस आणि अरुणा वाकनीस यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला त्याचे. इ के सी मोशन पिक्चर्स प्रॉडक्शन हाऊसनिर्मित ‘दी ब्रोकन विंडो’ या आगामी हिंदी सिनेमाचे निर्माते-दिग्दर्शक सुमीत पोफळे, सहनिर्माते दौलतसिंह राजपुरोहित या प्रसंगी उपस्थित होते. मराठी माध्यमात सर्व शिक्षण घेऊनही मैथिली इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिते, हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. हिंदी, इंग्रजी भाषेतील आपला काव्यलेखन, साहित्याचा, पटकथा आणि संवादलेखनाचा प्रवास कसा सुरू झाला, त्यांत कोणकोणत्या अडचणी आल्या, त्यातून आपण मार्ग कसा काढला, या सगळ्यात घरातल्या साहित्यिक वातावरणाचा, संस्कारांचा कसा उपयोग झाला वगैरे तपशील मैथिली अगदी सहज, सुंदररीत्या सांगत होती. प्रतिभावंत मुलगी म्हणून कौतुक तर वाटलंच पण हा शो सुरू करणाऱ्या आणि नवनव्या कलाकारांना हेरून त्यांना टाॅक शोमधे बोलतं करणाऱ्या निर्मात्या रीटा शर्मा यांचेविषयी जास्तच कौतुक वाटलं म्हणून त्यांच्याविषयी मैथिलीकडूनच अधिक जाणून घेतलं. मूळच्या हिमाचल प्रदेशातील असणाऱ्या रीटा शर्मा स्वत: संगीतातल्या जाणकार असून उत्तम गिटारवादक आणि व्याख्यात्या आहेत. ‘आरडीडी टाॅक शो’ची संकल्पनाही त्यांचीच. ‘कोशिश करनेवालोंकी हार नहीं होती..!’ ही या टाॅक शोची थिम आहे. नाट्य, चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य अशा विविध कलांच्या क्षेत्रांत नवे काही करू पाहणारे कलावंत खूप आहेत. आजच्या स्पर्धेच्या जगात नवनव्या आव्हानांना तोंड देत हे कलावंत धडपडत असतात. सायास आणि अभ्यास यांची कांस त्यांनी सोडलेली नसते; पण अशा कलाकारांची दखल कुणी घेताना दिसत नाहीत. यूट्यूबवर सध्या सुरू असलेल्या ‘आर डी डी टाॅक शो’मुळे ही उणीव आता राहणार नाही, असा विश्वास रीटा शर्मा यांना वाटतो. येत्या १७ फेब्रुवारीला मुंबईमध्ये त्यांचा हजारावा टाॅक शो संपन्न होणार आहे. धडपडणाऱ्या कलावंतांसाठी खरोखरच हा टाॅक शो म्हणजे एक उत्तम व्यासपीठ आहे. ज्या उदयोन्मुख कलाकारांना या टाॅक शो मधे आमंत्रित करावे असे वाटते त्यांनी ‘आरडीडी टाॅक शो’ चॅनलवर जाऊन शो पाहावेत, सदस्यत्व घ्यावे, असे मैथिली रमेश यांनी आवाहन केले आहे. (संपर्क : रीटा शर्मा rddfilmcasting2020@gmail.com / मैथिली रमेश : ८६००१४२११०)

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page