“भगवान बुद्ध आणि महावीरांची शिकवणच आजच्या जागतिक परिस्थितीवर तोडगा “— प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

मावळ मराठा न्युज नेटवर्क -पिंपरी-चिंचवड- सायन्स पार्क सभागृहात कर्मयोगिनी महिला संस्था आयोजित कवयित्री सीमा शिरीष गांधी यांच्या “मी झाड व्हावे” या काव्यसंग्रहाचे तसेच स्वर्गीय पुष्पाबाई शांतीलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आयोजित “पत्र पुष्पांजली” या पत्रलेखन स्पर्धेतील पत्रसंग्रहाचे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी एड. प्रार्थना सदावर्ते, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, नीलिमा फाटक, अरुण बोऱ्हाडे आणि दिनेश भोंबड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, आजच्या जागतिक परिस्थितीत संघर्ष, असहिष्णुता आणि मूल्यांचा ऱ्हास वाढताना दिसतो. अशा काळात भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांच्या शांतता, करुणा आणि अहिंसेची शिकवणच मानवजातीला योग्य दिशा देऊ शकतात. समाजात समता, सहअस्तित्व आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी त्यांच्या विचारांची आज अत्यंत गरज आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.कवयित्री सीमा शिरीष गांधी यांच्या “मी झाड व्हावे” या काव्यसंग्रहाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, झाड हे जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवते. झाड देत राहते. सावली देते, फळे देते आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता जग समृद्ध करते. अशा झाडासारखे होण्याची प्रामाणिक इच्छा या कवितांमधून व्यक्त होते. हा काव्यसंग्रह समृद्ध जाणिवांचा चांदणप्रवास अभिव्यक्त करणारी सुंदर कलाकृती आहे.या कवितांवर ज्येष्ठ कवी मा.धो. महानोर आणि बालकवी यांच्या काव्यपरंपरेचा प्रभाव जाणवतो. मुक्तछंदात लिहिलेल्या या कविता वाचकांशी थेट संवाद साधतात. साधी, सहज आणि हृदयस्पर्शी भाषा ही या कवितांची ताकद आहे तर अर्थपूर्णता हा त्यांचा आत्मा आहे, असेही त्यांनी नमूद केले. “पत्र पुष्पांजली” या संग्रहाची सूक्ष्म समीक्षा समीक्षक एड. प्रार्थना सदावर्ते यांनी अचूक केली, नीलिमा फाटक यांनी कवयित्री सीमा गांधी यांच्या “मी झाड व्हावे ” या कवितासंग्रहाचे भावसौंदर्य रसिकांसमोर उलगडले.”कुणा पांथस्थाला बुद्ध करण्या वृक्ष ज्ञानी अजान व्हावे, मी झाड व्हावे, मी झाड व्हावे” अशा समृद्ध जाणिवांनी नटलेला हा काव्यसंग्रह कवयित्री सीमा गांधी यांनी स्नेहल आणि सलोनी या त्यांच्या दोन सुनांना अर्पण केला. अरुण बोऱ्हाडे यांनी सौ सीमा गांधी यांच्या काव्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी कर्मयोगिनी महिला संस्थेच्या मराठी संवर्धन आणि पर्यावरण विषयक कार्याबद्दल प्रशंसक उद्गार काढले.भारतीय टपाल पत्र विभागातील जनसंपर्क अधिकारी दिनेश बोंबड यांनी लोप पावलेल्या पत्रलेखनाच्या संस्कृतीला उजाळा दिल्याबद्दल टपाल विभागातर्फे संस्थेचे अभिनंदन केले.कार्यक्रमात “पत्र पुष्पांजली” पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.प्रथम क्रमांक (विभागून) : सौ. राजश्री बिनायकिया, विभावरी कुलकर्णीद्वितीय क्रमांक (विभागून) : ॲड. रामचंद्र पाचुणकर, रेणुका कळंबेतृतीय क्रमांक (विभागून) : डॉ. पौर्णिमा कोल्हे, नेहा शेटेउत्तेजनार्थ : जयंत कोपर्डेकर, राधिका बडगुजर, अपर्णा जाधवसर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि “पत्र पुष्पांजली” हा विशेष अंक देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कवी, वाचक आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य, निसर्गप्रेम आणि मानवी मूल्यांचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. प्रा. दिगंबर ढोकळे यांनी या देखण्या प्रकाशन सोहळ्याचे प्रभावी, बहारदार निवेदन करून रसिकांची मने जिंकली,स्नेहल गांधी यांनी गणेश वंदना केली, सौ सीमा शिरीष गांधी यांनी प्रास्ताविक केले, राज ,नील,सलोनी, शिरीष, शांतीलाल गांधी यांनी संयोजनात मदत केली.या प्रकाशन सोहळ्यासाठी पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक दिग्गज साहित्यिक उपस्थित होते, सौ.स्नेहल गांधी यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page