पवनानगर मार्गावरील धोकादायक खिंड ठरतेय प्रवाशांसाठी जीवघेणी; दगड कोसळून कारचे नुकसान,प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!

मावळ मराठा न्युज -​पवनानगर,पवनानगरकडे जाताना लागणारी घाटातील खिंड सध्या प्रवाशांसाठी व वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक बनली असून, या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांमध्ये कायम भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकताच या खिंडीत अचानक दगड कोसळल्याची दुर्घटना घडली, ज्यामध्ये एका चालत्या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली, तरी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.​पवनानगर आणि परिसराचा मुख्य संपर्क असलेला हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, येथील खिंडीत दरडी कोसळण्याच्या किंवा दगड सुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पावसाळा असो वा नसो, कधीही डोक्यावर दरड कोसळेल या भीतीने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी वारंवार प्रशासनाकडे या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडले आहे, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.​रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या धोकादायक दरडींची छाटणी करणे, संरक्षक जाळ्या (Rockfall Netting) बसवणे किंवा तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करणे गरजेचे असतानाही संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली आणि यात कोणाचा जीव गेला, तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता नागरिक आणि प्रवास करणाऱ्या वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.​संबंधित प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या गंभीर बाविची तातडीने दखल घेऊन या खिंडीतील धोकादायक भाग लवकरात लवकर सुरक्षित करावा, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page