कलापिनी कुमार भवन उपक्रमाचा ९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा








मावळ मराठा न्युज – तळेगाव,कलापिनिमध्ये कुमार भवन या उपक्रमाचा ९ वा वर्धापन दिन ११ जानेवारी रोजी संस्थेच्या प्रांगणात साजरा झाला. नटराज पूजन झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुलांनी ‘ निःशब्दांचे आकाश आमुचे ‘ हे प्रवीण दवणे यांनी रचलेले आणि विनायक लिमये यांनी संगीतबद्ध केलेलं गीत सुरेल आवाजात सादर केले. या वर्षी कुमार भवन मध्ये सातत्याने येणाऱ्या मुलांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला गेला. कुमार भवनच्या प्रशिक्षकांनी या मुलांना मार्गदर्शन केले. परीक्षार्थी मुलांनी ‘विंचू चावला’ ही मनवा वैद्य या विध्यार्थिनीने लिहिलेली आणि ‘सिंहगडला जेव्हा जाग येते’ ही ऋग्वेद अराणके या विद्यार्थ्याने बसवलेली; अशा दोन नाटिका सादर केल्या. पहिल्या नाटकातील भारूडातून दिलेला संदेश आणि दुसऱ्या नाटकातला खुमासदार विनोद याला प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या. विशेष म्हणजे या दोन्हीचे दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, सूचक वेशभूषा-रंगाभूषा हे सर्व मुलांनीच केले होते. दोन्ही नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नंतर मधुवंती हसबनीस यांनी लिहिलेले आणि बसवलेले ‘जंगल कथनी’ हे नाटुकले मुलांनी सादर केले. या नाटकातील प्राण्यांची, चेहेऱ्यावर केलेली रंगभूषा खूपच छान होती. सुप्रिया खानोलकर, मधुवंती रानडे आणि राखी भालेराव यांनी ही रंगभूषा केली होती.या वर्षी वर्धापन दिनाला सौ. विशाखा कुलकर्णी ( उर्सेकर ) या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या.मुलांना लहान वयातच कलापिनीचं व्यासपीठ उपलब्ध झालंय आणि पालक इतक्या मोठया संख्येने त्याचा लाभ घेतात, याबद्दल त्यांनी समाधान आणि कौतुक व्यक्त केले. मुलांनी बसवलेली नाटकं बघून मुलांच्या कल्पना शक्तीला इथे वाव मिळतो आणि याचा मुलांना मोठेपणी खूप फायदा होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. विशाखाताई तळेगावात माहेरी असताना कलापिनीमधून केलेल्या अनेक भूमिकांची, नाटकांची, सह कलाकारांची हृद्य आठवण त्यांनी शेवटी काढली.प्रमाणपत्र अभ्यासक्रमात परीक्षक म्हणून आलेल्या पूजाताई डोळस यांनी मुलांची परीक्षा घेताना आलेला त्यांचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की मुलं या वयात देखील नाटकाचा इतका सखोल आणि सर्वांगीण विचार करतात, त्यांची कल्पनाशक्ती वापरतात. त्यांच्या वयाचा निरागसपणा नाटकातून प्रत्ययास येतो. आणि हे सर्व, मुलं सातत्याने येतात, प्रशिक्षक त्यांच्यावर मेहेनत घेतात, यामुळे शक्य होतं असं त्या आवर्जून म्हणाल्या.संस्थेचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि त्याची अगदी शिस्तीत घेतलेली परीक्षा हा अगदी स्तुत्य उपक्रम आहे आणि मुलांच्या सादरीकरणातून ते दिसून आलं असं ते म्हणाले. मुलांनी जेव्हा गीत सादर केले तेव्हा अचानक संगीताचा ट्रॅक बंद पडला, पण अजिबात नं डगमगता त्यांनी गाणं सुरू ठेवलं. इतकंच नाही तर समोर बसलेल्या मुलांनी टाळ्या वाजवत त्यांना ताल द्यायला सुरुवात केली, यातून मुलांचं एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती आणि शिवाय प्रेक्षकांना आपलंस करण्याची हातोटी दिसून आली, असं ही डॉ. परांजपे म्हणाले.अभ्यासक्रम उपक्रमातील सर्व मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देण्यात आले. पालक मनोगत श्री सचिन मंगल यांनी व्यक्त केले. त्यावेळी कुमार भवन मध्ये येणाऱ्या मुलांना त्याचा किती आणि कसा फायदा होतो, मुलाचा आत्मविश्वास वाढतो, आणि ते शालेय अभ्यासात देखील दिसून येतं असं ते म्हणाले. मुलांचं प्रतिनिधित्व करत शाम्भवी जाधव हिने तिच्या मनोगतात ‘ कलापिनीत, कुमार भवन मध्ये आम्ही घडतो’ असे सांगितले, आणि कायम कलापिनिशी निगडित राहू असे आश्वासन दिले.त्यानंतर सर्व मुलांनी नेहेमीच्या उत्साहाने विपुल परदेशी याने बसवलेले नृत्य सादर केले.एक surprise item म्हणजे प्रमुख पाहुण्या विशाखाताई कुलकर्णी यांनी मुलांसाठी स्वतः रचून, चाल लावून म्हणून दाखवलेला रॅप. मुलं आणि सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली.शेवटी श्लोक म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौख्यदा गोसावी यांनी केले. संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि कुमार भवन प्रमुख अंजली सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम, त्याची संकल्पना, परीक्षा याची सविस्तर माहिती दिली. अहवाल वाचन आणि आभार प्रदर्शन ऋचा पोंक्षे यांनी केले. ध्वनी नियोजन सुमेर नंदेश्वर यांचे होते, तर हितेश शिंदे यांनी क्षणचित्रे टिपली. नयना डोळस, संदीप मनवरे यांच्यासह नीता धोपाटे, रुपाली पाटणकर आणि जान्हवी पावसकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.कार्यक्रमाला सर्व पालक, आणि संस्थेचे इतर सभासद मोठया संख्येने उपस्थित होते आणि मुलांचं भरभरून कौतुक करत होते. सर्व मुले आणि पालकांतर्फे भेटवस्तू देऊन अंजली सहस्रबुद्धे आणि ऋचा पोंक्षे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला संस्थेचे श्रीशैल गद्रे, अशोक बकरे, लीना परगी, चेतन शहा, संजय मालकर हे पदाधिकारी उपस्थित होते.



