तळेगावकरांनी अनुभवला नाट्यपरंपरेतील हिमालय; कलापिनी कलामंडळात हिमालयाची सावली या नाटकाचा प्रयोग संपन्न









मावळ मराठा न्यूज -तळेगाव दाभाडे,कलापिनी सांस्कृतिक केंद्राच्या कलामंडळाच्या या वर्षातील “हिमालयाची सावली” या नाटकाचा प्रयोग प्रचंड प्रेक्षकांच्या साक्षीने अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी अनेक रसिक प्रेक्षकांना येणाऱ्या वर्षांसाठी कलामंडळाचे सभासदत्व घेण्याची संधीही मिळाली. नाटक चालू असताना अभूतपूर्व शांतता प्रेक्षकांनी राखली.१०० वर्षापूर्वीच्या घटनेवर लिहिले गेलेले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावरून प्रेरित होऊन लिहिलेले तीन अंकी कौटुंबिक/सामाजिक नाटक लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या तिन्ही पातळ्यांवर सरस होते. शरद पोंक्षे यांनी नानासाहेबांच्या भूमिकेला त्यांच्या अप्रतिम अभिनयाने अगदी योग्य न्याय दिला.. श्रुजा प्रभूदेसाई यांनीही “सावित्री” हे पात्र अगदी उत्कृष्ट प्रकारे जिवंत केले. नानासाहेबांच्या अभिनयाला अगदी तोडीस तोड असाच त्यांचा अभिनय होता. बाकी कलाकारांनीही त्यांच्या भूमिका खूप चांगल्या तऱ्हेने वठवल्या.. नाटकाने प्रेक्षकांना पूर्णवेळ खिळवून ठेवले होते. “हिमालयाची सावली” प्रयोगाच्या अभिवाचनाचे अनेक प्रयोग कलापिनीच्या कलाकारांनी सादर केले होते. या कलाकारांच्या हस्ते नाटकातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. अंजली कऱ्हाडकर, संजय मालकर, अभय लिमये, प्रसाद पूर्णपात्रे, अमित देशपांडे, विश्वास देशपांडे, मकरंद जोशी, कामिनी जोशी, श्रीशैल गद्रे, डॉ. अनंत परांजपे यांनी शृजा प्रभुदेसाई, विघ्नेश जोशी, जयंत घाटे, सृजन देशपांडे, प्राची हिंगे, सोनाली राजे, चैतन्य राव, ओंकार बर्वे, विजय मिरगे आणि शरद पोंक्षे यांचा सत्कार केला.शरद पोंक्षे यांनी कलापिनीच्या एकोणपणास वर्षांच्या वाटचालीबद्दल कौतुक केले. दर्जेदार नाटकाचा प्रयोग आयोजित केल्याबद्दल धन्यवाद दिले.संकर्षण कऱ्हाडे यांनी कलापिनी नाट्यमंचचा आणि तळेगावचे प्रेक्षकांचा झी टीव्हीवरील कार्यक्रमात मुद्दाम उल्लेख करून कौतुक केले असे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी सांगितलेरसिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “आपण तळेगावकर खूप भाग्यशाली आहोत की कलापिनीमुळे आपल्याला असे बहारदार कार्यक्रम पाहायला मिळत आहेत.” आणखीन एक प्रतिक्रिया देताना सांगितले, “ नाटकात कोणत्याही अवास्तव हालचाली नाहीत, नेपथ्याचा डोलारा नाही, गाणी नाहीत ना नृत्य, मात्र आहे ती कानेटकरांनी लिहिलेली आणि सर्व कलाकारांनी अंतर्बाह्य समरसतेने वागवलेली मराठी भाषा. जो पर्यंत आपण खरं सोनं पाहत नाही तोपर्यंत सोन्याचा मुलामा दिलेली वस्तूच आपल्याला सोन्याची वाटत राहते. आपल्या मुलांना हे खणखणीत सोनं पाहता यायला हवं यासाठी असे नाट्यप्रयोग मुद्दाम दाखवले गेले पाहिजेत. हे प्रयोग सुरु ठेवणाऱ्या कलापिनीसारख्या संस्था असल्या पाहिजेत. आज कलापिनीमुळे कितीतरी कुमारवयीन मुलांनाही हा प्रयोग सहज बघता आला. नाटक ब्लॅकआउट मुळे नाही तर लख्ख अभिनयामुळे आणि कथेमुळे प्रभावी होतं हे अनुभवता आलं.”कलामंडळ प्रमुख चेतन शहा, विनायक भालेराव, हेमंत झेंडे, अशोक बकरे, अंजली सहस्रबुद्धे आदींनी संयोजन केले.



