लोणावळ्यात संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा;धार्मिक,सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम,गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

मावळ मराठा न्युज -लोणावळा,दि. १०,संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या ६७६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शिंपी समाज ट्रस्ट, लोणावळा यांच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भांगरवाडी येथील श्री लक्ष्मीनारायण गणपती मंदिर परिसरात हा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण महापूजेने झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजेत सहभाग घेतला. त्यानंतर लोणावळ्यातील रेल्वे विभागाच्या श्री संत नामदेव महाराज उद्यान परिसरातील नामफलक सुशोभीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला.
सोहळ्याच्या निमित्ताने लहान मुलांपासून तरुणांपर्यंत विविध वयोगटांसाठी खेळ, मनाचे श्लोक, महालक्ष्मी अष्टक, कालभैरव अष्टक तसेच श्रीसूक्त पठण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला बालक, विद्यार्थी व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत नामदेव महाराजांचे विचार आणि संतपरंपरेतील संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे विशेष महत्त्व ठरले.

यावेळी गुणवंत विद्यार्थी तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. समाजातील गुणवंतांचा गौरव आणि ज्येष्ठांचा आदर या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
सायंकाळी आयोजित समाजप्रबोधनपर व्याख्यानात ह.भ.प. माऊली दाभाडे, तळेगाव यांनी मार्गदर्शन केले. संत नामदेव महाराजांच्या भक्ती, समता, मानवता आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांवर प्रकाश टाकत संतविचारांची आजच्या समाजजीवनातील उपयुक्तता त्यांनी विशद केली.
दिवसभर विविध कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार, समाजात एकोपा निर्माण करणे, नवीन पिढीला संतपरंपरेशी जोडणे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे उपस्थित समाजबांधव व नागरिकांनी कौतुक केले.
शिंपी समाज ट्रस्ट, लोणावळा यांच्या वतीने आयोजित या संजीवन समाधी सोहळ्यास समाजबांधव, भाविक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या संजीवन समाधी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मिलिंद चिंबळकर, रमेश पिसे, रमेश बारटक्के, दीपक शिंत्रे, महेश कांबळे, अमोल धोंगडे, उमेश जुन्नर, अमित मुळे, रेखाताई मुळे, कल्पनाताई टेलर कल्याणजी, धीरूभाई कल्याणजी, जितेंद्र कल्याणजी, नंदकुमार हरसुळे, विजय खर्डे,सुधाकर हेंद्रे यांच्यासह शिंपी समाज ट्रस्टच्या पदाधिकारी व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page