मधुश्री व्याख्यानमाला -अंतिम पुष्प; काश्मीरचे भौगोलिक स्थान हा जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू!-चंद्रशेखर टिळक







मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक- ०९ मे २०२६) ‘काश्मीरचे भौगोलिक स्थान हा जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ०८ मे २०२६ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘जागतिक राजकारण आणि काश्मीर’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना चंद्रशेखर टिळक बोलत होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर शर्मिला बाबर, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्षा माधुरी ओक, सचिव राजेंद्र बाबर, कोषाध्यक्ष अजित देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविकातून, ‘सोळा वर्षांच्या कालावधीत मधुश्री व्याख्यानमालेत अनेक नामवंत आणि अभ्यासू वक्त्यांनी ज्ञानदानाचे काम केले!’ अशी माहिती दिली. शर्मिला बाबर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. गिरीश प्रभुणे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘भविष्यात काश्मीर प्रश्नावरून मोठे युद्ध उद्भवू शकते!’ असे मत व्यक्त केले.चंद्रशेखर टिळक पुढे म्हणाले की, ‘मी अनेकदा पायी फिरून काश्मीर खोऱ्यातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काश्मीर हा खूप वर्षांपासूनचा धुमसता प्रश्न आहे, हे मान्य केलेतरी तो प्रश्न सुटेल याबाबत मी आशावादी आहे. पूर्वीचे दहशतवादाच्या सावटाखाली असणारे काश्मीर आणि श्रीनगरच्या चौकात तिरंगा फडकवला जाणारे आताचे काश्मीर यामध्ये जमीन – अस्मानाचा फरक आहे. कोणत्याही दोन राष्ट्रांमध्ये युद्ध पेटत राहावे, हा कायम अमेरिकेच्या आर्थिक धोरणाचा सुप्त उद्देश राहिला आहे. दक्षिण आशियातील मध्यवर्ती अन् मोक्याच्या जागी असलेले काश्मीर आपल्या नियंत्रणात असावे यासाठी अमेरिका आणि चीन सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामुळेच चीनचे आक्रमण, पाकिस्तानसोबत झालेली युद्धे यांच्या मुळाशी काश्मीर आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगतिपथावर आहे, ही बाब जगातील अनेक देशांना अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळेच अमेरिका पाकिस्तानाला अर्थसाहाय्य करते अन् जागतिक स्तरावर पाठिंबा देत असते. त्या बळावरच पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करीत असतो; परंतु भारताच्या राजकीय मुत्सद्देगिरीमुळे काश्मीरचा धुमसता प्रश्न निश्चितच सुटेल!’ आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणातील विविध संदर्भ उद्धृत करीत टिळक यांनी मिस्कील शैलीतून विषयाची मांडणी केली.सलीम शिकलगार, अश्विनी कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, राज अहेरराव, चिंतामणी कुलकर्णी, प्रा. पी. बी. शिंदे, मनीषा मुळे, चंद्रकांत शेडगे, मिलिंद कुलकर्णी, शरद काणेकर यांनी संयोजनात सहकार्य केले. डॉ. भाग्यश्री अत्रे यांनी सूत्रसंचालन केले. किरण कुलकर्णी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली.



