*मन या अदृश्य इंद्रियावरचे भाष्य म्हणजे ‘मनाचे श्लोक’ – राहुल सोलापूरकर**’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा उदंड प्रतिसादात संपन्न*

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर)०९ फेब्रुवारी २०२६ ‘मन या अदृश्य इंद्रियावरचे भाष्य म्हणजे ‘मनाचे श्लोक’ होय!’ असे विचार ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळीची मराठी माध्यम शाळा, यमुनानगर, निगडी येथे रविवार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी व्यक्त केले. मनोनिग्रह फाउंडेशन आयोजित समर्थ भारत अभियान अंतर्गत आंतरशालेय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर व सूर्य नमस्कार स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात राहुल सोलापूरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाचे अजेयबुवा रामदासी होते; तसेच समर्थ रामदासस्वामी अभ्यासक विजय गाडगीळ, राम रैना, संयोजक डॉ. राजीव नगरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड परिसरातील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने समारंभात सहभागी झाले होते. राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले की, ‘समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या शिष्यांसमोर सलग अठ्ठेचाळीस तास केलेल्या कथनाला ‘मनाचे श्लोक’ असे संबोधले गेले. षड्रिपूंपासून मुक्त होण्याचा मार्ग या श्लोकांतून त्यांनी सांगितला आहे!’ प्रास्ताविकातून डॉ. राजीव नगरकर यांनी, ‘समर्थ रामदासस्वामी यांच्या साहित्याचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी समर्थ भारत अभियान विविध उपक्रमांचे आयोजन करते. विद्यार्थ्यांचे मन आणि मनगट बळकट व्हावे म्हणून शालेय स्तरावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यातील विजेत्यांमधून राज्यस्तरीय पाठांतर स्पर्धेसाठी विजेत्यांची निवड करण्यात येईल!’ अशी माहिती दिली. अजेयबुवा रामदासी यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘पाठांतरासोबतच मनाचे श्लोकांच्या अर्थाकडेही लक्ष दिले पाहिजे; कारण व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी ते पथदर्शक आहेत!’ असे मत व्यक्त केले.शिशूगट ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सुमारे सात गटांमध्ये विभागणी करून ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या एकूण तीस शाळांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेतसहभाग नोंदविला होता. त्यापैकी सातशे विद्यार्थी अंतिम फेरीत पोहोचले. प्रथम क्रमांकाचे विजेते विद्यार्थी खालीलप्रमाणे :-शिशूगट :-मुद्रा कुंभार (रामा किड्स), निरंजन कुंभार (ब्लुमिंग बर्ड्स)खेळगट :-सुखदा क्षीरसागर, शिवम बांदेकर (मनोरम बालक मंदिर), श्रावणी जोशी (सिटी प्राईड), माहिरा आगरवाल (रामा किड्स), रुद्र दाभोळकर (अमृता विद्यालयम्), शिवलिंगप्पा हटगुंडी (एम एम एस बालक मंदिर)पहिली – दुसरी गट :-अद्विक दळवी, आयुष जोशी, वेद जोशी (सिटी प्राईड), उर्वी शाळिग्राम (विद्यानिकेतन), देवांश शेलार (एस बी पाटील)तिसरी – चौथी गट :-अनय करोगळ (सिटी प्राईड)पाचवी – सहावी गट :-ईश्वरी चौधरी (ज्ञानप्रबोधिनी)सातवी – आठवी गट :-वेदान्तिका मोरे (विद्यानिकेतन)विद्यार्थी खुला गट :-सायेशा पाटील सर्वेश कस्तुरेपालक खुला गट :-विजया वाडेकरसूर्य नमस्कार स्पर्धेत केंब्रिज विद्यालय, निगडी या शाळेने प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी शाळेला सर्वाधिक सहभाग आणि सांघिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याप्रीत्यर्थ गौरविण्यात आले; तसेच परीक्षकांना सन्मानित करण्यात आले. शिल्पा नगरकर, हेमंत जोशी, अजिंक्य नगरकर, अनघा काळे, राजेश शिराळकर, आनंद देशमुख आणि राष्ट्र सेवा प्रबोधिनीच्या स्वयंसेवकांनी संयोजनात परिश्रम घेतले. ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page