कपिल सरोदे विरोधात लोणावळ्यात मातंग समाज आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

मावळ मराठा न्युज – लोणावळा : सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून मातंग समाजाबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहरातील मातंग समाज एकवटला असून संबंधित व्यक्ती कपिल सरोदे याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणी लोणावळा शहरातील मातंग समाजाच्या वतीने लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये कपिल सरोदे याने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओमधून मातंग समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.समाजबांधवांनी सांगितले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ मातंग समाजाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा अपमान करणे हे अत्यंत निषेधार्ह असून समाज कधीही सहन करणार नाही, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि जातीय भावना भडकविणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.या निवेदनावेळी लोणावळा शहर मातंग समाजाचे अध्यक्ष सोमनाथ जयसिंग बोभाटे, समाजाचे ज्येष्ठ नेते नाना रोकडे, दयानंद कांबळे, एकनाथ घोरपडे, तसेच शिवशाही व्यापारी संघ या महाराष्ट्र राज्यव्यापी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा साबळे, उदय बोभाटे, विकास साठे, शुभम खुडे, आदित्य फासगे, सागर बोभाटे, तुषार सावंत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी “जय लहुजी, जय अण्णाभाऊ” अशा घोषणा देत संबंधित व्यक्तीचा जाहीर निषेध नोंदवला. समाजाच्या भावना दुखावणाऱ्या कोणत्याही प्रकाराला सहन केले जाणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page