*सोडून द्या…आनंदी रहा; मनःशांतीचा साधा पण प्रभावी मार्ग*







मावळ मराठा न्यूज -आजकाल टी.व्ही., वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर नजर टाकली तर सर्वत्र नकारात्मक बातम्यांचा भडिमार होताना दिसतो. हिंसाचार, गैरवर्तन, भ्रष्टाचार, वाद, अपघात अशा घटनांना इतकी प्रसिद्धी दिली जाते की जणू समाजात चांगलं काही घडतच नाही. प्रत्यक्षात आपल्या आसपास अनेक चांगल्या, प्रेरणादायी, सकारात्मक घटना घडत असतात; परंतु त्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही, हे दुर्दैवी आहे.नकारात्मक विचार मनात का निर्माण होतात आणि वाढत का जातात याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते – माणूस काहीच सोडायला तयार नाही.अपमान, अपयश, वाईट अनुभव, एखाद्याने बोललेले शब्द, एखादी घटना – या गोष्टी आपण वर्षानुवर्षे मनात धरून ठेवतो. घटना संपते, वेळ बदलतो, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते; पण आपण त्या आठवणी सोडत नाही. त्यामुळे खरा त्रास घटना देत नाही, तर आपण ती घटना मनात किती काळ धरून ठेवतो यामुळे होतो.आज माणूस बाहेरच्या गोष्टींमुळे कमी आणि मनात साठवून ठेवलेल्या गोष्टींमुळे जास्त त्रास सहन करत आहे. आपण मनात राग, द्वेष, अपमान, अपेक्षा, भूतकाळ साठवून ठेवतो. आपलं मन म्हणजे कचराकुंडी नाही, जिथे नकारात्मक घटनांचा साठा करावा. कचराकुंडीमध्ये कचरा साठवला की दुर्गंधी येते; तसेच मनात नकारात्मक विचार साठवले की त्याचा त्रास प्रथम स्वतःला आणि नंतर आसपासच्या लोकांना होतो.एखाद्या व्यक्तीने आपल्याला एकदा दुखावलेले असते; पण आपण ती गोष्ट वारंवार आठवून स्वतःलाच अनेक वेळा दुखावत राहतो. घटना छोटी असते; पण आपण तिला इतकी मोठी बनवतो की ती आपल्या मनावर राज्य करू लागते. त्यातून राग, द्वेष, सूडभावना, संताप निर्माण होतात. प्रत्यक्षात आपल्या आयुष्यातील बहुतेक समस्या या घटनांमुळे नसतात, तर त्या घटनांबद्दल कधी सहानुभूती मिळवण्यासाठी तर कधी पाठिंब्यासाठी आपण मनात तयार केलेल्या सुरस कथा असतात.मनःशांती हवी असेल तर काही गोष्टी सोडून द्यायला शिकले पाहिजे. यासाठी निसर्ग हा सर्वोत्तम गुरु आहे. झाडे पानगळ झाली म्हणून रडत नाहीत. नदी पाणी अडवून ठेवत नाही म्हणून ती प्रवाही, निर्मळ आणि जीवनदायी राहते.च पाणी अडवले तर दलदल तयार होते. त्याचप्रमाणे आपणही जुन्या गोष्टी, राग, अपमान, भूतकाळ अडवून ठेवला तर मनात दलदल निर्माण होते.सोडून देणं म्हणजे Detachment.पण Detachment म्हणजे लोकांपासून दूर जाणे, भावना नसलेला थंड माणूस होणे असा त्याचा अर्थ नाही. Detachment म्हणजे स्वतःला त्या घटना, शब्द, व्यक्ती यांच्या मानसिक प्रभावातून मुक्त करणे.आपल्या आनंदाचे आणि दुःखाचे रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नये.आपलं काम प्रामाणिकपणे करत राहावं; जगातील सर्व महान खेळाडू, लिडर्स,व्यवस्थापक याचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की ते फक्त आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देत राहिले, रिझल्ट ची पर्वा न करता.कारण रिझल्ट वर कोणाचाच कंट्रोल नसतो.आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं पण त्याच्या परिणामांना आपल्या सुख-दुःखाचे कारण बनवू नये. कारण यश-अपयश, लोकांची मतं, परिस्थिती, वेळ – या अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. त्यामुळे परिणामांबद्दल अति विचार न करता आपलं सर्वोत्तम देत राहणं हाच मनःशांतीचा मार्ग आहे.भारतीय संस्कृतीतही “सोडून देणे” या विचाराला मोठं महत्त्व आहे. प्रभू श्रीरामांनी राज्य सोडून क्षणार्धात वनवास स्वीकारला, भगवान श्रीकृष्ण आयुष्यभर कुठेही अडकून राहिले नाहीत; पण त्यांनी आपलं कर्तव्य आणि कार्य मात्र कधी सोडलं नाही. वाईट घटनांना सकारात्मक पद्धतीने सामोरे जात त्यातून चांगले परिणाम निर्माण करणारे कार्य करीत त्यांनी मानवजातीपुढे आदर्श निर्माण केला.याचा अर्थ सोडून देणं म्हणजे जबाबदारी टाकून देणं नव्हे, तर आसक्ती सोडणं होय.मानसशास्त्राच्या भाषेत जेव्हा माणूस बाहेरील गोष्टींवर, लोकांच्या प्रतिक्रियांवर, कामाच्या परिणामांवर आपल्या आनंदासाठी अवलंबून राहतो, तेव्हा त्याला Emotional Dependency म्हणतात. यामुळे ताण, चिंता, overthinking, निर्णय घेण्यात अडचणी आणि कधी कधी नैराश्य सुद्धा येऊ शकते.सोडून देणं म्हणजे राग,दु:ख,प्रेम भावना दाबणं नाही; तर या भावनांना आपल्या निर्णयावर,सद्विवेक बुद्धीवर राज्य करू न देणं होय. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही गोष्टी दुर्लक्ष करण्यासारख्याच असतात. हे दुर्बलतेचे नव्हे तर Emotional Maturity चे लक्षण आहे.तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देता, संवेदनशील बनता तेव्हा तुमचा कंट्रोल लोकांच्या हातात जातो.कोणत्याही मानवी नात्यात थोडी मोकळीक, स्पेस दिली तर नातं तुटत नाही; उलट त्यात आदर आणि समज वाढते. प्रत्येक गोष्ट पकडून ठेवली की नात्यांमध्ये ताण निर्माण होतो.म्हणूनच आनंदी आणि शांत जीवन जगायचं असेल तर एक साधा नियम लक्षात ठेवा:काही गोष्टी सोडून द्या,काही गोष्टी विसरून जा,काही गोष्टी दुर्लक्ष करा,आणि आयुष्य आनंदाने जगा.संत साहित्यामध्येही हा विचार सुंदर शब्दांत सांगितला आहे.संत तुकाराम म्हणतात –*ठेविले अनंते तैसेचि राहावे,चित्ती असो द्यावे समाधान*शेवटी एकच –*ज्याला सोडता येतं, त्यालाच खरं जगता येतं. *.सोडून द्या… आनंदी रहा.@ संतोष मंदाकिनी उत्तम गुरवदि.२५/०३/२०२६



