राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडकडून अभिवादन

मावळ मराठा न्युज -पुणे, दि. ३१ मे २०२६ : लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मनिरपेक्षता आणि समाजहितासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आज सारसबाग समोरील अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक आदर्श, न्यायप्रिय आणि दूरदर्शी शासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या राज्यकारभारात सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम केले. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रे, मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी आणि पाणपोया उभारून त्यांनी लोककल्याणाचे कार्य केले. काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसह अनेक ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या राज्यात प्रजेला न्याय, सुरक्षा आणि विकासाची हमी मिळाली होती. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पुणे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, “राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एका संस्थानच्या शासक नव्हत्या, तर त्या लोकहितवादी, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल राज्यकर्त्या होत्या. त्यांनी स्त्री नेतृत्वाचा एक आदर्श नमुना संपूर्ण देशासमोर उभा केला. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार, कार्यपद्धती आणि लोकाभिमुख प्रशासन आजच्या काळातही मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या कार्याचा वारसा जतन करणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”या अभिवादन कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते. जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, प्रवक्ते संतोष शिंदे, प्रीतम कोंढाळकर, गौरी कांबळे, राजेश अडसूळ, रामा कसबे, महादेव मातेरे, गणेश बिरवाडकर, तसेच संभाजी ब्रिगेडचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page