माजी सैनिक विकास संघ दिघी, पुणे यांच्यातर्फे कारगिल विजय दिवस साजरा









माजी सैनिक विकास संघ दिघी, पुणे (महाराष्ट्र विभाग) यांच्यातर्फे आज रविवार, दिनांक 26 जुलै 2026 रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . तदपश्चात सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अमर जवान ज्योत सुंदर फुलांनी सजविण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अमर जवान ज्योतला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व या युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित असलेल्या कारगिल योद्धांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भोसरी मतदारसंघाचे दमदार आमदार पै. महेशदादा लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिघी प्रभागातील विद्यमान नगरसेवक आणि नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते, संघाचे संचालक, स्वीकृत संचालक सल्लागार, सभासद आणि महिलावर्ग या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली. माजी सैनिक विकास संघ दिघीचे अध्यक्ष कॅप्टन भास्कर आंब्रे, उपाध्यक्ष कॅप्टन आमसिद्ध भिसे, आयोजक अमित मोहिते पा. कार्याध्यक्ष कॅप्टन मारुती गायकवाड व अविनाशजी मोहिते पा. उद्योजक आयडीयल संस्थापक ,सचिव श्री विलास पाटील यांनी उपस्थितांचे आभार व मनोगत प्रकट केले. वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी 200 पेक्षा जास्त माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सर्व उपस्थितांना अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दरवर्षी 26 जुलै हा दिवस भारतात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1999 मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य, धैर्य आणि पराक्रम दाखवत शत्रूचा पराभव केला या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. कारगिल हे जम्मू आणि काश्मीर मधील उंच पर्वतीय क्षेत्र आहे. अत्यंत कठीण हवामान, बर्फाच्छादित डोंगर आणि प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. अनेक जवानांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. या युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ग्रिनेडियर योगेंद्र सिंह यादव आणि रायफल मॅन संजय कुमार यांसारख्या अनेक शूरवीरांनी अद्वितीय शौर्य दाखवले. त्यांच्या पराक्रमामुळे भारताला विजय मिळाला आणि देशाचा तिरंगा अभिमानाने फडकत राहिला. कारगिल विजय दिवस आपल्याला देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि त्याग यांची प्रेरणा देतो.



