‘OTP,पासवर्ड कुणालाही देऊ नका’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा कानमंत्र

मावळ मराठा न्युज -जामनेर, ‘OTP आणि पासवर्ड कुणालाही देऊ नका, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका’ असा महत्त्वपूर्ण संदेश देत इंदिराबाई ललवाने ज्युनियर स्कूल, जामनेरपुरा येथे सायबर अवेअरनेस सेशन घेण्यात आले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देण्यात आली.या सत्रात जान्हवी सपकाळे, वैष्णवी सैतवाल, साक्षी पाटील, विद्या सोनवने, राहुल चोपडे आणि जय ठाकूर या सायबर वॉरियर्सनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फेक कॉल, बनावट लिंक, सोशल मीडिया फसवणूक, OTP फ्रॉड, बनावट वेबसाइट आणि ऑनलाइन आमिषांद्वारे होणाऱ्या विविध स्कॅमची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.यावेळी Quick Field Foundation कडून देण्यात आलेल्या सायबर अवेअरनेस बुकलेट्सचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. पुस्तिकेतील माहिती कशी वाचायची, त्यातील महत्त्वाचे मुद्दे कसे समजून घ्यायचे आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी त्याचा उपयोग कसा करायचा, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.डिजिटल जगात केलेली एक छोटीशी चूकही मोठ्या अडचणीचे कारण ठरू शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती न देणे, कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे, सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवणे आणि संशयास्पद घटना घडल्यास तातडीने पालक किंवा विश्वासू व्यक्तीला माहिती देणे, असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला.प्राचार्य गायकवाड सर यांच्या सहकार्याने आणि आर. बी. आमले सरांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेची माहिती उत्सुकतेने जाणून घेतली. ‘सावध राहा, सुरक्षित राहा’ हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page