‘बोला अमृत बोला’ सुरेल संगीतानुभव देणारी कलापिनीची सुरेल दिवाळी पहाट!

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,दीपावलीच्या मंगलमय वातावरणात कलापिनी आणि हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बोला अमृत बोला’ या सांगीतिक कार्यक्रमात सुरेल गीतांनी आणि बहारदार नृत्याविष्कारांनी रसिकांची पहाट अविस्मरणीय केली. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी पहाट कार्यक्रमाचे हे तिसावे वर्ष होते. भक्तिगीते, शास्त्रीय गायन, भावगीते, नृत्य, संस्कृत रॅप आणि लोकसंगीत अशा विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणातून कार्यक्रमात वैविध्यपूर्ण रंग भरले. यावेळी हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अॅड रवींद्रनाथ दाभाडे, देवराम वाघोले, नामदेव आंद्रे, अनिल वेदपाठक, सुर्यकांत वाघोले, कैलास भेगडे, पंढरीनाथ दाभाडे, राजेश सरोदे,निजाम काझी व अन्य पदाधिकारी तसेच कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष अशोक बकरे, चेतन शहा, श्रीशैल गद्रे, हेमंत झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नांदीने झाली. त्यानंतर ‘हरी म्हणा’, ‘गणेशवंदना’, ‘शास्त्रीय गायन व भजन’, ‘शोधिसी मानवा’, ‘नाम तुझे घेता’ अशा भक्तिरसपूर्ण सादरीकरणांनी वातावरण मंगलमय झाले. प्रणव केसकर यांनी सादर केलेले ‘सुखाचे हे सुख’ लक्षणीय ठरले. डॉ. वैशाली जुंदरे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात कीर्ती ढेंबे आणि राजश्री धोंगडे यांच्या नृत्याविष्कारांनी विशेष रंगत आणली. खुशी, दित्या, रेवा आणि वैदेही यांच्या ‘विहिणबाई विहिणबाई’ या सादरीकरणाने तसेच स्वरा माळी, आर्या परांजपे, अवनी परांजपे, तेजस जोशी, मेधा रानडे, सावनी खाडिलकर, गोविंद राठोड, अक्षय म्हाप्रळकर अमृता झा आणि श्रावणी देशमुख यांच्या गायनाने रसिकांची दाद मिळवली. ‘म्हातारा इतुका’, ‘तारिणी नववसन’, ‘अंग अंग तव अनंग’, ‘विनायका हो’, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘कशी जाऊ मी वृंदावना’ आणि ‘रेशमाच्या रेघांनी’ अशा गीतांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.विशेष आकर्षण ठरले ते विनायक लिमये यांनी सादर केलेले ‘संस्कृत रॅप’ हे अभिनव सादरीकरण. पारंपरिक संगीताबरोबरच आधुनिक संगीतप्रकाराचा झालेला हा संगम रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरला. मध्यंतरानंतर ‘मन उधाण वाऱ्याचे’ या गीताने वातावरणात नवी ऊर्जा निर्माण केली.आनंद कशेळकर, अजिंक्य गुरव, समीर महाजन, अविनाश शिंदे, कौस्तुभ ठोसर, देवयानी लेले, मैथिली शिंदे, जान्हवी पटवर्धन यांनी कार्यक्रमाच्या उत्तरार्धात लोकसंगीताच्या मेजवानीने रसिकांना ठेका धरायला लावला. शेवटी ‘बोला अमृत बोला’ आणि ‘सर्वात्मका’ या गीतांनी कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली. लीना परगी, विनायक लिमये यांनी सांगीतिक संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. मंगेश राजहंस, अनिरुद्ध जोशी, मंदार परगी (तबला), विनायक कुडाळकर (ढोलकी), योगीराज राजहंस, गंधार ढवळे (तालवाद्य), प्रदीप जोशी, विनायक लिमये (संवादिनी) आणि राजेश झिरपे (सिंथेसायझर) यांची साथ लाभली. डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. भारतीय संगीतपरंपरेचा वारसा जपत नव्या प्रयोगांनाही सामावून घेणारी कलापिनीची ही दिवाळी पहाट रसिकांच्या मनात आनंदाचे आणि सांगीतिक समाधानाचे सूर उमटवून गेली.कलापिनी महिला मंच, स्वास्थ्य योग, कुमार भवन, बाल भवन आणि कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page