विसापूर किल्ल्यावर पुन्हा तोफगोळे सापडले! दीपावली निमित्त शिव मंदिरात दीपोत्सव

मावळ मराठा न्युज -लोणावळा, दि. १० श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ले विसापूरवरील शिवमंदिरात भव्य दीपोत्सव करण्यात येतो. यावर्षी देखील शिवपिंडीस अभिषेक व महाआरती करण्यात आली त्यानंतर शिवमंदिर परिसरात दीपोत्सव करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक सचिन टेकवडे, कार्याध्यक्ष सागर कुंभार, बसप्पा भंडारी, सचिन निंबाळकर, अनिकेत आंबेकर, विशाल शिंदे, ऋषिकेश कडू तसेच पुरातत्व विभागाचे कर्मचारी व किल्ल्यावर आलेले बहुसंख्य पर्यटक उपस्थित होते. गडभ्रमंती करत असताना गडावरील दारूगोळा कोठाराजवळ मंचाचे कार्याध्यक्ष सागर कुंभार यांना जमिनीतून थोडासा वर आलेला तोफगोळा नजरेस पडला. सहजपणे खोदून तो तोफगोळा बाहेर काढण्यात आला व पुरातत्व विभागाचे कर्मचारी सुभाष दहिभाते, मच्छिंद्र वाघमारे, रोहित नगीने, हेमंत वाघमारे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे म्हणाले मंचाच्या कार्यकर्त्यांना २०१८ साली तीन, २०१९ साली दोन, २०२४ साली एक व यावर्षी पुन्हा एक तोफगोळा सापडला. हे सर्व तोफगोळे एकाच परिसरात मिळून येत आहे. तेवढ्याच परिसरात जर उत्खनन केले तर बरेच काही तोफगोळे अजून सापडू शकतील. या तोफगोळ्या संदर्भात डेक्कन कॉलेजचे इतिहास संशोधक डॉ. सचिन जोशी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले हे तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारातील असून ते तोफेत दारू भरून नंतर वातीद्वारे उडवीले जात असत. या तोफगोळ्याचे वजन पाच किलो पेक्षा जास्त आहे. याबाबतीत मंचातर्फे वेळोवेळी पुरातत्त्व विभागाला आवाहन करण्यात आले आहे . गडावर शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन केले तर इतिहासाच्या दडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टी प्रकाश झोतात येतील. तसेच, गडावरील अनेक राजवाडे, जलकुंड व इतर वास्तू भग्नावस्थेत पडलेले आहेत.दीपोत्सव कार्यक्रमाचे नियोजन सचिन टेकवडे, सागर कुंभार, बसप्पा भंडारी, सचिन निंबाळकर ,अनिकेत आंबेकर, विशाल शिंदे, ऋषिकेश कडू यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page