*विद्यार्थिदशेतच पर्यावरण संवर्धन संस्कार गरजेचे! – सलीम शिकलगार*






मावळ मराठा न्युज पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : १६ ऑगस्ट २०२६’विद्यार्थिदशेतच सामाजिकता आणि पर्यावरण संवर्धन संस्कार होणे गरजेचे आहे!’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लायन्स इंटरनॅशनल चे विभागीय अध्यक्ष सलीम शिकलगार यांनी दुर्गादेवी टेकडी, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी व्यक्त केले. ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रांतपाल श्रेयस दीक्षित यांच्या मार्गदर्शनानुसार व विविध सेवाभावी संस्थांच्या प्रयत्नातून निगडी प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडीवर आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सलीम शिकलगार बोलत होते. माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक वायकर यांनी उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. या उपक्रमात उस्फूर्तपणे निगडी, इनोवेशन देहूरोड, फीनिक्स, रॉयल चिंचवड, भोसरी, तळेगाव, चाकण, मेट्रोपोलीस, सेलिब्रेशन, भोजापूर गोल्ड , पीसीएमसी स्टार, पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह, आकुर्डी अग्रसेन इत्यादी सुमारे चौदा क्लबने सहभाग नोंदवला. शिल्पी कुमार यांच्यासह सिटी प्राईड इंटरनॅशनल स्कूल आणि डाॅ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रांताच्या प्रथम महिला प्रीती दीक्षित यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘आजकाल समाजात विद्यार्थी आणि तरुण यांची प्रतिमा काहीशी मलिन झाली आहे; पण त्यांना सोबत घेऊन विधायक कार्यात सहभागी करून घेतले पाहिजे. एक देशी झाड किमान दोनशे वर्षे जगते. याचाच अर्थ एक झाड पाच मानवी पिढ्यांसाठी उपयुक्त ठरते!’ याप्रसंगी ‘कावळा म्हणतो ‘काव काव’ माणसा माणसा एकतरी झाड लाव!’ अशा मनोरंजनात्मक घोषणा देत विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील व्यक्तींनी देशी वृक्षारोपणाच्या आनंदात सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या संयोजनात निगडी क्लबच्या सभासदांनी सहकार्य केले.



