आमदार सुनील शेळके यांनी आमच्या टपऱ्या नाही वाचवल्या तर आमदार देखील आमचे राहणार नाहीत – टपरी पथारी हातगाडी संघटनेचा आमदार शेळके यांना इशारा

मावळ मराठा न्यूज -लोणावळा,लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सरकारच्या नियमानुसार बायोमॅट्रिकसर्व्हे केला,टपरी पथारी हातगाडी संघटनेची निवडणूक घेतली,पदाधिकारी निवडले ते त्या संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.परंतु निवडणूक झाल्यानंतर फक्त तोंड ओळख साठीची दोन वर्षात फक्त एकदाच मीटिंग घेतली.त्यांनी आम्हाला एकदाही वेळ दिला नाही त्यामुळे आमच्या निवडून येऊन काय उपायोग? असा उद्दिघ्न सवाल नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सदस्य पदाधिकारी यांनी केला. आमदार यांनी फक्त निवडणुकीपुरता वापर करून घेतला आता ते देखील आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाहीत,त्यामुळे आता त्यांनी आमच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही,किंवा आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही उध्वस्त होणार आहोत त्यामुळे आमदार सुद्धा मग आमचे राहणार नाहीत असा हतबल झालेल्या संघटनेच्या पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली मग आम्हाला पदे ही नको आणि काहीच नको असे सांगत आपला राग व्यक्त केला. मावळ तालुक्याचे आमदार व लोणावळ्यातील नगरसेवकांनी निवडणुकीपुरता आमचा वापर करून घेतला व आता आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. आम्हाला कोणीही वाली राहिलेले नाही अशी उद्विग्नता लोणावळा टपरी पथारी हातगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. लोणावळा शहरातील अधिकृत टपऱ्या यांचेवर कारवाई केल्यास लोणावळा नगर परिषदेचे कामकाज चालू दिले जाणार नाही असा इशारा देखील लोणावळा नगर परिषदेला टपरी संघटने कडून देण्यात आला.दोन वर्षांपूर्वी लोणावळा शहरामध्ये दीनदयाल योजनेअंतर्गत टपरी व्यवसायिकां सोबत पथारी व हातगाडी व्यवसायिकांचा देखील सर्वे करण्यात आला. त्यामध्ये जवळपास ६३९ व्यवसायिकांचा बायोमेट्रिक सर्व्हे करत शासकीय नियमाप्रमाणे त्यांची निवडणूक घेत त्यामधून फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली. या फेरीवाला समितीला कोणत्याही पद्धतीने विश्वासात न घेता लोणावळा नगरपरिषदेने लोणावळा शहरातील टपरी,पथारी व हातगाडी व्यवसायिकांना २४ तासात आपली दुकाने काढून घेण्याबाबतच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांवर जेसीबी फिरवत कारवाई केली जात असताना आमदार सुनील शेळके गप्प,ज्या नगरसेवकांना आम्ही निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस झटलो ते सुद्धा आम्हाला मदत करत नाहीत मग आम्ही जायचं कुणाकडे असा संतप्त सवाल टपरी पथारी हातगाडी संघटनेचे अध्यक्ष गणेश चव्हाण, सचिव रमेश म्हाळसकर, उपाध्यक्ष संदीप पोटफोडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत व्यक्त केला. जुन्या व नोंदणीकृत व्यवसायकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही मात्र रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व नव्याने जागोजागी उभारण्यात आलेल्या टपऱ्या हात गाड्या व पथारी व्यवसायिकांवर अतिक्रमण कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट सांगितले होते. मात्र काही जुन्या व्यवसायिकांना अतिक्रमणाच्या नोटिसा केल्यामुळे टपरी संघटना ही आक्रमक झाली आहे. जोपर्यंत आमचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. बाहेरून लोणावळा शहरामध्ये येऊन अनाधिकृतपणे दुकाने थाटत व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही देखील आहोत. रमेश म्हाळसकर म्हणाले यापेक्षा मागील कौन्सिल च्या सभागृहाने टपरी व्यवसायिकांना सहकार्य केले मात्र नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी निवडून आल्यापासून आमच्यावर वारंवार कारवाईचे सत्र उघडले आहे. आमदार सुनील शेळके यांनी तर उघडपणे टपरी व्यवसायिकांच्या विरोधात भूमिका घेत लोणावळा शहरातील टपऱ्यांची अतिक्रमण काढून टाकण्याबाबत स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. संघटनेचे उपाध्यक्ष संदीप पोटफोडे यांनी येत्या दोन ऑक्टोबर पासून लोणावळा नगर परिषदेच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला असून संघटनेने त्याला पाठिंबा दिला आहे. संघटनेचे पदाधिकारी देखील या उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मात्र मुख्याधिकारी यांनी आचार संहिता लागू झाल्याने आपण नंतर बैठक घेऊ त्यामुळे उपोषण पुढे ढकलावे असे प्रशासनकडून सांगण्यात आल्याचे पोटफोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोणावळा नगरपरिषद प्रशासन जर पुढील बैठक कधी घेणार आहे असे लिखित दिले तर उपोषण स्थगित केले जाईल असेही संदीप पोटफोडे यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page