पंतप्रधान मोदींचे पदवीचे प्रमाणपत्र मागितल्याप्रकरणी केजरीवाल यांना गुजरात उच्च न्यायालयाने ठोठावला २५ हजारांचा दंड


मावळ मराठा न्यूज,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचे प्रमाणपत्र मागणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना महागात पडले आहे. पंतप्रधानांच्या पदवीचे प्रमाणपत्र मागितल्याप्रकरणी त्यांना गुजरात उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.अरविंद केजरीवाल यांनी आरटीआयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी आणि पदव्यूत्तर पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागितला होता. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी RTI द्वारे मुख्य माहिती आयोगाकडे (CIC) या माहितीची मागणी केली होती. मुख्य माहिती आयोगाने पीएमओ जनमाहिती अधिकारी, गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती देण्यास सांगितले होते. त्यानंतर माहिती आयोगाने (CIC) काढलेल्या आदेशाला गुजरात विद्यापीठाने आव्हान देणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज (दि.३१ ) एकसदस्यीय खंडपीठाकडून सुनावणी झाली. गुजरात विद्यापीठाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पीएम मोदींच्या पदवीची माहिती आरटीआय कायद्यांतर्गत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी प्रमाणपत्र देण्याची गरज नसल्याचे गुजरात हायकोर्टाने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी मागितल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने आज आपला निकाल सुनावला. न्या. बीरेन वैष्णव यांनी मुख्य माहिती आयोगाच्या आदेशाला रद्द केले आहे. त्याशिवाय, हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.




