*गणेशोत्सव शांततेत व्हावा यासाठी कामशेत पोलिसांचा रूट मार्च; रंगीत तालीम*







मावळ मराठा न्युज -कामशेत, दि. १२ सप्टेंबर २०२६ :आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, निर्भय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कामशेत पोलीस ठाण्याच्या वतीने आज दि. १२/०९/२०२६ रोजी कामशेत शहरात रूट मार्च काढण्यात आला.सदर रूट मार्चची सुरुवात कामशेत पोलीस ठाणे येथून करण्यात आली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक – कामशेत बाजारपेठ – पंडित नेहरू विद्यालय – मच्छी मार्केट – पवना चौक मार्गे पुन्हा कामशेत पोलीस ठाणे असा रूट मार्च काढण्यात आला.रूट मार्चमध्ये कामशेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, २ दुय्यम अधिकारी, १५ पोलीस अंमलदार, २ महिला पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड जवान सहभागी झाले होते.रूट मार्चनंतर महर्षी कर्वे आश्रम शाळा, कामशेत शहर येथील मैदानावर जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. संभाव्य कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस दलाने ती परिस्थिती प्रभावीपणे व तत्परतेने हाताळावी, यासाठी सदर रंगीत तालीम घेण्यात आली.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उत्सव शांततेत व सलोख्याच्या वातावरणात साजरा करावा, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कामशेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी केले आहे.



