लोणावळ्यातील चार नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित; मुदतबाह्य दूध, झुरळांचा वावर!नागरिकांच्या जीवाशी खेळ

मावळ मराठा न्युज -लोणावळा, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील चार नामांकित हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणी दि ऑर्किड हॉटेल, रिदम लोणावळा, द फर्न हॉटेल आणि बेसिलिका हॉटेल या चार हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.महाराष्ट्र शासनाच्या ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत FDA च्या पुणे विभागाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी लोणावळ्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी चारही हॉटेल्सवर परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.वलवण येथील दि ऑर्किड हॉटेलमध्ये स्वयंपाकघर आणि शीतगृहात मिळून मुदतबाह्य दुधाची ११ पाकिटे आढळली. तसेच कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवणे, अस्वच्छ रेफ्रिजरेटर, स्वयंपाकघरात साचलेले पाणी आणि विनाझाकण कचरापेट्या अशा त्रुटी आढळल्या.रिदम लोणावळा हॉटेलच्या मुख्य स्वयंपाकघरात आणि बेकरी विभागात फ्रिजजवळ झुरळे आढळली. शाकाहारी-मांसाहारी तसेच कच्चे आणि शिजवलेले पदार्थ स्वतंत्रपणे साठवले जात नव्हते. खाद्यपदार्थ आणि सॉसच्या बाटल्यांवर आवश्यक लेबलही नव्हते.बेसिलिका हॉटेलमध्ये मुदतबाह्य चीज आणि ब्रेड आढळून आले. हे पदार्थ तपासणी पथकाने जागेवरच नष्ट केले. याशिवाय शीतगृहात ठेवलेल्या कच्च्या चिकनमधून रक्तमिश्रित पाणी गळत असल्याचे आढळले. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र साठवणूक व्यवस्था नसल्याचेही तपासणीत समोर आले.तर द फर्न हॉटेलच्या बेकरी विभागात मुदतबाह्य खाद्य रंग आढळले. हे रंग बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. तसेच स्वयंपाकघरात मृत आणि जिवंत झुरळे आढळली. मसाले आणि कापलेली फळे उघडी ठेवण्यात आल्याचेही समोर आले. तपासणी पथकाने मुदतबाह्य खाद्य रंग जागेवरच नष्ट केले.या कारवाईनंतर FDA चे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्नपदार्थांची साठवणूक आणि परवान्याच्या अटींचे काटेकोर पालन करावे, अन्यथा परवाने निलंबित करण्यासह रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.लोणावळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असताना नामांकित हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात अशा त्रुटी आढळल्याने अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अश्या हॉटेल्स वर कारवाई झाल्याने बाकी हॉटेल्स व्यवसायिकांचे धाबे दनाणले आहे. ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी FDA ने अशा तपासण्या सातत्याने सुरू ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page