“गझल माणसे जोडण्याचे काम करते!” – प्रमोद खराडे

पिंपरी (प्रदीप गांधलीकरदिनांक) : २८ नोव्हेंबर २०२२ “ज्याप्रमाणे एका गझलेमध्ये भिन्न आशयाचे शेर असतात; त्याप्रमाणे समाजातील वेगवेगळ्या विचारांची माणसे जोडण्याचे काम गझल करते! पुण्यातील रसिक आता आपली सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊ लागला आहे; त्यामध्ये ‘गझलपुष्प’चा मोलाचा वाटा आहे. सुरेश भटांनी सुरू केलेली मराठी गझल चळवळ आता ‘गझलपुष्प’ पुढे चालवीत आहे!” असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, पिंपरी येथे रविवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी काढले. गझलपुष्प (पिंपरी-चिंचवड) या संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रमोद खराडे बोलत होते. उद्योजक विलास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश लुणावत, सागर शिंदे, रणजित कलाटे, टाटा मोटर्समधील व्यवस्थापक संजय चौधरी आणि गझलपुष्पचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांची व्यासपीठावर तसेच ज्येष्ठ साहित्यिक बशीर मुजावर, सुरेश कंक, अनिल दीक्षित, मधुश्री ओव्हाळ, शोभा जोशी, संतोष गाढवे, वैभव कुलकर्णी, दास पाटील आदींची श्रोत्यांमध्ये प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी गझलकार प्रा. डॉ. रूपेश देशमुख (पुलगाव, जिल्हा वर्धा) यांना ‘गझलपुष्प २०२२ पुरस्कार’ आणि अलका कुलकर्णी (नाशिक), सुनील खांडेकर (ठाणे), सतीश मालवे (अमरावती) यांना गझलपुष्प गझललेखन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार प्रदान करण्यात आलेत; तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रशांत पोरे यांनी संपादित केलेल्या ‘गझल पिंपरी-चिंचवडची’ आणि निशांत पवार लिखित’ऋतू माझ्या जिव्हाळ्याचे’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. दिवसभरात झालेल्या तीन गझल मुशायऱ्यांमधून संदीप जाधव, मीना शिंदे, नीलेश शेंबेकर, सरोज चौधरी, हेमंत जोशी, महेश खुडे, नंदकुमार मुरडे, सारिका माकोडे, प्रदीप तळेकर, संजय खोत, राज अहेरराव, सुहास घुमरे, अभिजित काळे, भूषण अहीर, आदेश कोळेकर, गणेश भुते, प्रफुल्ल कुलकर्णी, सुधीर चिट्टे या गझलकारांनी विविध आशय-विषयाच्या उत्कट गझलांचे अतिशय प्रभावी सादरीकरण करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. ‘मराठी गझलेतील स्थित्यंतरे’ या चर्चासत्रात प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर (सन १९२० ते १९८५ या काळातील मराठी गझल), प्रशांत वैद्य (सन १९८६ ते २००० या काळातील मराठी गझल चळवळ) आणि संजय गोरडे (२००१ सालापासून समाजमाध्यमांतून झालेली मराठी गझलेची वाटचाल) यांनी सविस्तर अन् अभ्यासपूर्ण ऊहापोह केला. उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या या सोहळ्यात ‘गझलसंध्या’ या सांगीतिक मैफलीने कळसाध्याय गाठला. गझलपुष्पच्या गझलकार सदस्यांच्या मराठी गझलरचनांचे संगीतकार सोपान मोरे आणि गायक तुषार शिंदे यांनी अत्यंत सुरेल सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अपूर्व पेठकर (हार्मोनियम), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) आणि हृषीकेश जगताप (तबला) यांनी साथसंगत केली. दिनेश भोसले यांनी मैफलीचे बहारदार निवेदन केले; तर समृद्धी सुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Chat with us