गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या चिंतामणी,क्रांतिवीर आणि जिजाऊ या पुरस्कारांचे वितरण


मावळ मराठा न्यूज,पिंपरी,(प्रदीप गांधलीकर)दिनांक : ०१ मे २०२३ गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने चिंतामणी, क्रांतिवीर आणि जिजाऊ या पुरस्कारांचे वितरण रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले. चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवड येथे विधानपरिषद आमदार उमा खापरे, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे जगद्गुरू तुकोबारायांचे भव्य मंदिर साकार व्हावे म्हणून कार्यरत असलेल्या ह. भ. प. साहेबराव तथा बाळासाहेब काशीद यांना चिंतामणी पुरस्कार, वयाच्या साठीनंतर शंभरपेक्षा जास्त धावण्याच्या मॅरेथॉन शर्यती जिंकणारे तसेच तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धाविजेते खेळाडू हरिश्चंद्र थोरात यांना क्रांतिवीर चापेकर पुरस्कार आणि सुमारे पन्नास वर्षांपासून चिंचवड येथे नाममात्र दरात वैद्यकीय सेवा प्रदान करणाऱ्या डॉ. पुष्पा कलमदानी यांना जिजाऊ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी उमा खापरे यांनी, “पिंपरी – चिंचवड या औद्योगिकनगरीला सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख मिळाली आहे, या गोष्टीचा खूप आनंद होतो!” अशा भावना व्यक्त केल्या. पुरस्काराला उत्तर देताना पुरस्कारार्थींच्या वतीने बाळासाहेब काशीद यांनी, “हा पुरस्कार म्हणजे तुकोबांचा आशीर्वाद आहे!” अशी कृतज्ञता व्यक्त केली.गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. नाना जाधव यांनी आभार मानले.




