आमच्या इस्लामपूरकरांचा तेंडल्या ….मितेश घट्टे,अपर पोलिस अधीक्षक,पुणे ग्रामिण


मावळ मराठा न्यूज:-पुणे, ६ मे २०२३, देव आहे की नाही हा मोठा गहन प्रश्न आहे. मात्र देव वाटणारी अनेक माणसं आजूबाजूला वावरत असतात. त्यापैकी काही व्यक्तीमत्वे आम्ही याचि डोळा आमच्या आयुष्यात पाहू शकलो ही दैवानुभूती देणारे प्रसंग आहेत. सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर ही अशीच काही आकाशाएवढ्या उंचीची माणसं आम्ही प्रत्यक्ष ऐकली आणि पाहिली. त्यांच्यासारखं आयुष्यात मोठे व्हावे अशी स्वप्नं पाहत कित्येक जण धडपडत असतात. त्यामुळे प्रत्येक गावांत अशी धडपडणारी आणि ध्येयाने वेडी झालेली पोरं सहज पहायला मिळतात. अशा धडपडणाऱ्या पोरांचा प्रवास तेंडल्या या मराठी चित्रपटात पहायला मिळतो. १९९० च्या दशकात त्या काळातल्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अब्दुल कादीरच्या चेंडूला मिसरुड पण न फुटलेल्या शाळकरी सचिनने लिलया मैदानाबाहेर भिरकावून दिले, हा शाळकरी पोर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मेकग्रा, पाकिस्तानचा इम्रान वसिम आणि दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉकला तितक्याच धाडसाने सामोरे गेला. सचिनची धावांची भूक त्याच्या वयाबरोबर वाढतच होती आणि त्यातून त्याने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली. मराठमोळ्या सचिनने ९० च्या दशकांत प्रत्येक आबालवृद्धांच्या मनांवर भलतेच गारूड घातले होते. दूरवरच्या खेडोपाडयांतसुद्धा अनेकांना सचिन घरातला एक घटक वाटायचा. त्याचा खेळ पाहण्यासाठी शक्य तो सारा आटापिटा केला जात असे. सचिन फलंदाजीसाठी मैदानावर उतरताच सारे श्वास रोखून प्रत्येक क्षण मनांत साठवून ठेवण्यासाठी आतुर असतात. चित्रपटातला नायक गजा हा सचिनचा कट्टर भक्त आहे. सचिनची खेळी पाहण्यासाठी देहभान विसरुन तो टी व्ही च्या पडद्यासमोर ठाण मांडतो, त्यासाठी त्याच्या उपजिविकेकडे पण दुर्लक्ष करण्यासाठी तो क्षणाचा देखील विचार करत नाही. सचिनच्या प्रेमापोटी त्याचा खेळ पाहण्यासाठी सारे अडथळे पार करण्याची त्याची तयारी आहे. त्यातूनच त्याने रंगीत टी व्ही घेण्याचा ध्यास बाळगला. टी व्ही खरेदीला आवश्यक पैसे गोळा करण्यासाठी मोलमजूरी किंवा खोल विहरीत खोदकाम करण्यात पण कमीपणा मानला नाही. त्याचवेळी गावातला छोटा तेंडल्या म्हणून ओळखला जात असतो. त्याची सचिनप्रमाणे MRF ची बॅट वापरण्याची मनिषा असते. वर्गातल्या इंजिन सोबत क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी बालवयातील मनसुबे आणि तिरकस चाली पाहताना नकळत हसू येते. ग्रामीण जीवनाशी निगडीत अगदी सहज व साध्या सोप्या वळणाची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून साकारणं तसे म्हटले तर मोठी रिस्क मानावी लागेल. कोणताही मोठा बॅनर पाठीशी नाही, प्रेक्षकांना आकर्षित करणारा मालमसाला – देखणे कलाकार नाहीत की, उटी काश्मिर इतकेच काय लोणावळा महाबळेश्वर सारखी निसर्गरम्य वा भव्य लोकेशन्स नाहीत. नायिकेमागून झाडामागे जात गाणी म्हणणारा नायक नाही, तरीही चित्रपटाच्या दर्जात कोणताही फरक पडल्याचे जाणवत नाही. साऱ्यांचाच हा पहिला प्रयत्न. तरीही इस्लामपूरच्या सचिन जाधव आणि त्याच्या टीमचे नवखेपण कोठेही जाणवत नाही, हेच या चित्रपटाचे खरं वेगळेपण असावे. अगदी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनीही या टीमचे कौतुक करताना त्याचा उल्लेख आवर्जुन केला. खरंच चित्रपटनिर्मिती कोणा येरागबाळ्याचे काम नाही. पाठीशी कोणताही अनुभव नसताना इस्लामपूरसारख्या ग्रामीण भागांत राहणाऱ्या सचिन व त्याच्या सहकाऱ्यांनी हे सुंदर स्वप्न पाहिले. प्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी या स्वप्नपूर्तीला आश्वासक हाक दिली. परंतु तरीही मार्गात अनेक अडचणीचे डोंगर उभे राहिले. त्यांवर मात करण्यासाठी शेत गहाण ठेवण्याची नामुष्की आली, तरी सचिन त्याच्या ध्येयापासून मुळीच डगमगला नाही. मुंबईतल्या सचिनच्या प्रेमापोटी इस्लामपूरच्या सचिनने त्याचे सर्वस्व पणाला लावले होते. तेंडल्या फार्मच्या स्वरूपात भाडेतत्वावर शेती करुन उत्पादने मुंबईत विकण्याचा प्रयत्न नगरच्या कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केला. देव प्रत्येक चांगल्या गोष्टी आणि माणसं यांच्या पाठीशी असतो याची प्रचिती प्रत्येक वेळी येत गेली. पण नेमके कोरोनाचे काळेकुट्ट ढग जमा झाले आणि सारं ठप्प झाले. निर्मितीनंतर तब्बल ५ वर्षांनी चित्रपट काल दि. ५ मे रोजी पडदयावर झळकला. पुण्यातल्या शहरी वातावरणात वाढलेले चोखंदळ प्रेक्षक कलाकारांना दाद देत असल्याचे चित्र मनाला सुखद करणारे होते. चित्रपटातली भाषा गावची आठवण करून देत होती. चित्रपटात दाखवलेली दृश्ये ओळखीच्या खुणा पटवून देत होत्या. अनेक कलाकार नित्य परिचयातले होते. ५ वर्षानंतर त्यावेळचे बालकलाकार आत तारुण्यांत प्रवेशकर्ते झाले असल्याची मिश्किल जाणीव होत होती. माझ्या इस्लामपूरच्या मातीत तयार झालेला चित्रपट पाहताना आणि माझ्या इस्लामपूरकर तरुण मित्रांचा ध्यास पूर्णत्वाला जात असताना त्यांचे कौतुक करण्यासाठी मी हजर असल्याचा आनंद मनांत काठोकाठ भरला होता. फिरोज शेख आणि अमन कांबळे या दोघांची मुख्य भूमिका आणि अद्वैता जाधवचा अतिशय नैसर्गिक अभिनय लक्ष वेधून घेतो. बालकलाकारांनी कथेत जिवंतपणा आणला आहे. सर्वांनी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन अवश्य पहावा, असाच हा सिनेमा झाला आहे.




