“मानवी जीवनातील दुःख हा जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनाचा गाभा”-प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी

मावळ मराठा न्यूज :-पिंपरी,(प्रदीप गांधलीकर)दिनांक : १४ मे २०२३ जी. ए. कुलकर्णी जन्मशताब्दीनिमित्त ग्रंथालयास प्रतिमा प्रदान करण्यात आली. “मानवी जीवनातील दुःख हा जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनाचा गाभा आहे!” असे प्रतिपादन जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय, स्वरगंगा सोसायटी जवळ, संत तुकारामनगर, पिंपरी येथे शनिवार, दिनांक १३ मे रोजी केले. मराठी साहित्यातील श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कलारंजन प्रतिष्ठान आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्यवाह प्रा. माधव राजगुरू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.‌ कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.‌ या प्रसंगी कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथालयास जी. एं.ची प्रतिमा प्रदान करण्यात आली.प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी पुढे म्हणाले की, “दिवसाला पाचशे पानं या अफाट गतीने जी. ए. कुलकर्णी जागतिक साहित्याचे वाचन करीत असत. त्यामुळे मराठी साहित्यसृष्टीतील सर्वाधिक वाचन करणारा साहित्यिक असा त्यांचा नावलौकिक होता. एकांतप्रिय असणाऱ्या जी. एं.नी वैश्विक दर्जाची साहित्यनिर्मिती केली आहे. एखाद्या गूढ गुहेसारखे त्यांचे कथालेखन मानवी आकलनाच्या पलीकडचे असल्याने ते अभिजात म्हणून गणले जाते!” जी. ए. कुलकर्णी यांच्या विविध कथांचा रसग्रहणात्मक ऊहापोह करून संजीव कुलकर्णी यांनी दुर्बोध वाटत असल्यातरी त्यांच्या कथांचे वाचन करा, असे आवाहन केले. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकातून, “मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या जी. ए. कुलकर्णी यांचे जन्मशताब्दीनिमित्त स्मरण करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे!” अशी भावना व्यक्त केली.धनंजय कुलकर्णी आणि प्रा. बी. आर. माडगूळकर यांनी रसिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.प्रा. माधव राजगुरू यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकातील जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्याचा समावेश करताना आलेल्या अनुभवांचे कथन केले.प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ नेरकर यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page