शंभूराजे…….सदर लेख पुणे ग्रामीणचे अपर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे यांनी २५ सप्टेंबर २०१८ रत्नागिरी ला पोस्टिंग ला असताना लिहला आहे

मावळ मराठा न्यूज;- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरीपासून सुमारे ४५ कि मी अंतरावर नकाशावर संगमेश्वर नावाचं गाव दिसते. गंमतीची गोष्ट अशी की, सरकारी कागदपत्रांत संगमेश्वर नावाच्या गावाची नोंद कोठे मिळतच नाही. आपणाला नोंद आढळते, ती कसबा नावाच्या गावाची. त्यामुळे काही जणया गावाला कसबा संगमेश्वर असे पण म्हणतात. होय… तेच कसबा, जिथे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती व शिवपुत्र धर्मवीर संभाजी राजांना मुघलीसैन्याने पकडले ते गांव!आज हे गांव कसे असेल? या उत्सुकतेपोटी इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी कसब्याला जायची मनोमन इच्छा होती, पण तसा योगच येत नव्हता. तेथील ग्रामस्थ व शिवसेनेचे जेष्ठ नेते श्री राजेंद्र महाडिक (माजी जि.प. अध्यक्ष) यांच्या आग्रहावरुन आमच्या जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल विभुते यांनी तसा योग घडवून आणला. कसबा गाव मुख्य राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या फर्लागाच्या अंतरावर वसलं आहे. गावात जाताना हमरस्त्याच्या दोन्ही बाजच्या घरांची रचना एकसारखीच दिसते. दर्शनी बाजूला मोठाल्या लाकडी खिडक्या, त्यात आडवे लोखंडी गज व दोन खिडक्यांचे मध्ये दरवाजा. कदाचितया साऱ्या घरांचा आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर एकच असावा, त्यामुळे घरांच्या रचनेत इतका सारखेपणा दिसत असावा अशी शंका वाटते. गावात हिंदु मुस्लिमांची लोकसंख्या बरोबरीने आहे. गावात प्रवेश केल्यानंतर समोर दिसतो तो शंभूराजांचा अर्धपुतळा ! ग्रामस्थांनी शंभूराजांचे स्मरण चिरंतन राहण्यासाठी दि. ३१ डिसेंबर १९९३ रोजी हा अर्धपुतळा उभारल्याचे सांगतात.अर्धपुतळयाला विनम्र अभिवादन करताना शंभूराजांचा सारा जीवनपट क्षणात नजरेसमोर येतो. खरं तर धर्मशास्त्र, युद्धशास्त्र व समाजशास्त्रांत एकाच वेळी पारंगत असणाऱ्या या अलौकिक राजाचे काही साहित्यिकांनी मनोरंजक व रोचक साहित्यनिर्मितीच्या अट्टाहासापोटी केलेल्या विपर्यास वर्णनातून मूळचे सारे शौर्य व त्याग झाकोळून टाकले. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्मलेल्या या राजपुत्राच्याव्यक्तिमत्वाला कधी न्याय मिळालाच नाही किंवा त्यांचा खरा इतिहास समोर आलाच नाही याची खंत वाटते. पुतळ्याच्या जवळच सरदेसाई वाडा आहे. पूर्वी हा वाडा खुप मोठा व विस्तिर्ण असावा याच्या खाणाखुणा त्याच्या तटबंदीच्या अवशेषांवरुन समजून येतात. याच वाडयात शंभूराजांचे वास्तव्य होते. या वाडयाकडून शास्त्री नदीकडे जाण्याचा मार्ग आजही दाट झाडीने व्यापलाआहे. आकाशाकडे वाढणाऱ्या उंच झाडांच्या दाटीवाटीमुळे सूर्याची किरणे मिळेल त्या वाटेने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. आज जर ही परिस्थिती असेल, तर ४०० वर्षांपूर्वी या परिसरांत किती दाट जंगले व जंगली श्वापदे असतील याचा अंदाज बांधता येतो. या परिसरात सुमारे ३६० मंदिरे असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी काही मंदिरे आजही त्याकाळच्या वास्तुशैलीच्या सौंदर्याची साक्ष देत उभी आहेत. स्तंभासाठीचे एकावरएक रचलेले मोठे दगड इतक्या खुबीने एकमेकांत जोडले आहेत की, लांबून ते स्तंभ एकाच दगडातून घडवलेले असावेत असा भास होतो. दुर्दैवानेडागडुजी व स्वच्छतेअभावी येथील मंदिरांच्या अवशेषांत झुडुपे वाढल्याने दगड एकमेकांपासून वेगळे होण्याची भिती आहे. मंदिरांच्या संख्येचेनिश्चित काही तरी गणिती सूत्र असावे, पण ते ध्यानात येत नाही.इथल्या वरुणा व अलकनंदा नद्यांच्या संगमावर कर्णेश्वर मंदिर उभं आहे. साधारणतः २६०० वर्षापूर्वीचे सदर मंदिर असावे असे काही म्हणतात, तर काही जण हे मंदिर पांडवांनी बांधल्याची आख्यायिका सांगतात. पण मंदिराच्या निर्मितीबाबत नेमकी माहिती उपलब्ध झाली नाही. मंदिराचा कळस पूर्णपणे कापीव कातळाप्रमाणे दिसतो. कदाचित अतिपर्जन्याच्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर ते अपेक्षितच आहे. मंदिराबाहेरील गणरायाच्या छोटेखानी मंदिरात वंदन करुन मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्याच्या छतावरील दगडातील नक्षीकाम लक्ष वेधून घेते. मंदिरात क्षणभर नतमस्तक होतांना समोर शंभूराजे ओलेत्या वस्त्रांनी महादेवाची पूजा करत असल्याचा भास झाला. महाराष्ट्राला शाप असणाऱ्या भाऊबंदकी व जहागिरीच्या तुकडयाच्या लालसेपोटी फितुरीमुळे मराठयांच्या इतिहासाने अवचित वळण घेतले… बालपणी खेळण्या बागडण्याच्या वयात मातृछत्र गमाविलेल्या, आग्याच्या मुघली कचाटीतून शिवरायांना सुखरुप बाहेर पडण्यासाठी तो कोवळा जीव एकटाच समोर गेला… अशा अनेक प्रसंगातून वैयक्तिक जीवन, सुख व नात्यांना पारखं होत स्वराज्यासाठी आहुती देणारा हा धर्मवीर फंदी फितुरीमुळे मुघलांच्या कैदेत पडला. याधक्क्याने त्यावेळी जोराने वाहणारा वारा थबकला, झाडांची पानांची सळसळ स्तब्ध झाली, पशू पक्षांनी केलेला आक्रोश गर्द झाडीत विरुन गेला … या धक्क्यातून अवघा महाराष्ट्र आज पण सावरलेला नाही… इथल्या लाल मातीत असंख्य मराठी मनांचे अश्रू थिजून गेलेत… आजही या परिसरातशंभूराजांसाठी तोच आक्रंद जाणवतोय.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page