“रामनामाने दोषांचे परिमार्जन!-“ह.भ.प. विश्वास कुलकर्णी


मावळ मराठा न्यूज :-पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : ०९ डिसेंबर २०२२ “मानवी जीवनात आसक्तीमुळे अनेक दोष निर्माण होतात; परंतु रामनामाने दोषांचे परिमार्जन होते!” असे विचार ह.भ.प. विश्वास कुलकर्णी यांनी श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक ०८ डिसेंबर २०२२ रोजी व्यक्त केले. पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात प्रथम पुष्पाचे निरूपण ह.भ.प. विश्वास कुलकर्णी यांनी केले. मुख्य संयोजिका माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भाजपा शहर चिटणीस राजेंद्र बाबर, विजय शिनकर, रवींद्र बोर्लीकर, अंजली पाटील, राधिका बोर्लीकर, सुभाष भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. “जयाचेनी नामे महादोष जाती |जयाचेनी नामे गती पविजेती |जयाचेनी नामे घडे पुण्यठेवा |प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||”या समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकावर निरूपण करताना विश्वास कुलकर्णी म्हणाले की, “मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही मनाची चतुष्टये आहेत. मानवी मन हे चंचल आहे. ते सतत विषयांचे चिंतन करते. त्यामुळे कामासक्ती वाढते. काम पूर्ण न झाल्याने क्रोध निर्माण होतो. क्रोधातून अहंकार उत्पन्न होतो. त्यामुळे मानवी जीवनाची खूप मोठी हानी होते. चंचल मनाला स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून प्रात:काळी देवाचे नाम अन् रूपचिंतन केल्यास जीवनात गती अन् प्रगती प्राप्त होते. म्हणूनच”घेई घेई माझे वाचे |गोड नाम विठोबाचे |”असे जगद्गुरु तुकोबा म्हणतात. कीर्तनाच्या पूर्वरंगात त्यांनी ययाती, रावण या पौराणिक व्यक्तिरेखांच्या कामदोषांचे विवेचन केले; तर उत्तररंगात तुलसीदास आख्यान कथन करताना, “कामातुर तुलसीदासाने पत्नीने केलेला रामनामाचा उपदेश आचरणात आणल्याने त्यांचे संत तुलसीदासात रूपांतर झाले; आणि ‘रामचरितमानस’सारखा अप्रतिम ग्रंथ त्यांनी सिद्ध केला!” असे विविध श्लोक, अभंग, भक्तिगीते उद्धृत करीत अतिशय रसाळ शैलीतून कुलकर्णी यांनी आपल्या निरूपणाद्वारे सांगत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना कानिफनाथ घैसास (तबला), धनवर्षा प्रभुणे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळाने संयोजनात सहकार्य केले. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. सरस्वती प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने महोत्सवाचा प्रारंभ आणि सामुदायिक आरतीने प्रथमपुष्पाचा समारोप करण्यात आला.




