“ज्याचे कोणाशी वैर नाही अशा भक्तांचा सखा भगवंत होतो!”-ह.भ.प. डॉ. अवंतिका टोळे

पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : ११ डिसेंबर २०२२ “ज्याचे कोणाशी वैर नाही अशा भक्तांचा सखा भगवंत होतो!” असे विचार ह.भ.प. डॉ. अवंतिका टोळे यांनी श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी व्यक्त केले. पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात तृतीय पुष्पाचे निरूपण ह.भ.प. डॉ. अवंतिका टोळे यांनी केले. माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, मुकुंद इनामदार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. “ज्याचा सखा हरी |त्यावरी विश्व कृपा करी |उणें पडों नेदी त्याचें |वारे सोसी आघाताचें |ऐसा अंकित भक्तांसी |म्हणे नामयाची दासी ||”या संत जनाबाई यांच्या अभंगाचे निरूपण करताना डॉ. अवंतिका टोळे यांनी सखा, मित्र, सुहृद या शब्दांमधील सूक्ष्म भेद सोदाहरण स्पष्ट केला. कीर्तनाच्या उत्तररंगात त्यांनी भागवतामधील दशम स्कंधातील सुदामा – श्रीकृष्ण आख्यान कथन केले.”पतित तू पावना |म्हणविसी नारायणा |”या संत कान्होपात्रा यांच्या अभंगासह संस्कृत, मराठी, हिंदी भक्तिरचनांचे गायन करीत डॉ. अवंतिका टोळे यांनी नवकोट नारायण श्रीकृष्ण आणि कफल्लक सुदामा यांच्या भेटीचे हृद्य वर्णन करताना श्रोत्यांच्या अंत:करणाला हात घातला. त्यामुळे सद्गदित झालेल्या सर्व श्रोतृवृंदाने उभे राहून कीर्तनसेवेला मानवंदना दिली. कानिफनाथ घैसास यांनी तबला आणि धनवर्षा प्रभुणे यांनी संवादिनीवर सुरेल साथसंगत केली. श्रीराम विश्वस्त मंडळाने संयोजनात सहकार्य केले. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक आरतीने तृतीयपुष्पाचा समारोप करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page