लावणीचा सच्चा सूर हरपला,सुलोचना चव्हाण यांचे निधन

मावळ मराठा न्यूज,किशोर मांदळे, पुणे :- गोड गळा लाभला आहे म्हणून प्रत्येक गाणे साखरेच्या पाकात घोळवून गायचे नसते. गाण्यातील शब्दकळेला अनुरूप स्वरांचा साज चढवायचा असतो, याचे अचूक भान असलेली प्रतिभावंत गायिका म्हणूनच सुलोचना चव्हाण यांनी आपले स्थान सूरांच्या दुनियेत अजरामर केले. चार इयत्ता शिकल्यावर शाळा सुटली. कुठल्याही संगीत घराण्याची शागिर्दी लाभली नाही. उत्तम तबलावादक असलेल्या पती श्यामराव चव्हाण यांनीच त्यांना लावणीतील शब्दांची वजने व ठसका यांच्या जागा समजावून दिल्या. अतिशय तन्मयतेने सुलोचनाबाईंनी लावणीची ही शब्दकळा समजून घेत त्यात स्वरांच्या आरोह अवरोहांनी ओतप्रोत आशय भरत लावणी अधिक देखणी व समृद्ध केली. लावणीच्या शब्दरचनेतील मादकतेचा प्रत्यय देणारी त्यांची विलक्षण स्वरमाधुर्यता रसिकांच्या काळजाचा ठोक चुकवत असे. लावणीला स्वरांची ही सच्ची अनन्यता त्या बहाल करू शकल्या कारण त्यांच्या जगण्यातही हा सच्चेपणा होता. सार्वजनिक कार्यासाठी त्यांनी अल्प बिदागी घेऊन कार्यक्रम केले व मोठा निधी अशा कार्य करणाऱ्या संस्थांना गाजावाजा न करता उपलब्ध करून दिला. सतत प्रकाशझोतात असूनही सांस्कृतिक क्षेत्रातील कुरघोड्या वृत्ती प्रवृत्तींपासून त्यांनी स्वतःला अलग ठेवले. त्यामुळे त्या मनाने अंतर्बाह्य निर्मळ राहिल्या. नव्वदी पार केलेले आरोग्यसंपन्न आयुष्य जगल्या. मराठी इतक्याच ताकदीने त्यांनी पंजाबी, गुजराती भाषेतील शब्दकळेलाही आपल्या सच्च्या सूरांचा परिचय दिला. तथापि, सर्वाधिक प्रेम त्यांनी लावणीवरच केले. लावणी सम्राज्ञी हे संबोधन त्यांना आचार्य अत्रे यांनी दिले. ती औपचारिकता विद्यमान नसती तरीही रसिकांसाठी त्या लावणी सम्राज्ञीच होत्या. सुलोचनाबाई आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या स्वरांचा अनाहत नाद आपल्यासोबत निरंतर असणार आहे. तो आपल्या अंतर्मनात निरंजन तेवत राहील. सुलोचनाबाईंच्या अजरामर सच्च्या सूराला विनम्र अभिवादन !





