निळकंठनगर विठ्ठल मंदिर देवस्थानच्या पवित्र वातावरणात काकडआरती संपन्न



मावळ मराठा न्यूज़ :-तळेगाव ,ज्येष्ठ साहित्यिक वक्ते डॉक्टर शाळीग्राम भंडारी या काकड आरतीचे प्रमुख मानकरी होते.यावेळी निवृत्त डीवायएसपी श्री व सौ प्रदीप देसाई, तळेगाव सिटी रोट्रूरक्टचे सभासद काकड आरती महापुजा संपन्न झाल्यानंतर डॉ. शाळीग्राम भंडारी लीखीत- संत वाड्य्मावर आधारित पुस्तकांचे वाटप भावीकांना करण्यात आले. डॉ.शाळीग्राम भंडारी यांनी मनोगत व्यक्त करताना समाज जीवनाचा जेव्हा तोल ढळतो,तत्त्वांना ग्लानी येथे, नीतीचा ऱ्हास होतो, आणि माणसाचा पशु होतो तेव्हा समाजाला सावरणारा कोणीतरी महात्मा प्रगट होतो. त्याच्या पावलांनी तयार होणारी वाट लोकजीवनात नव्या जाणिवांची पहाट घेऊन येथे. असंच काहीसं कार्य निवृत्त तहसीलदार श्री रामभाऊ माने हे गेले सहा-सात वर्षे सातत्याने नीलकंठ नगर येथे करीत आलेले आहेत. खरोखरच निळकंठनगर वासियांच्या दृष्टीने ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. विठ्ठल रुक्माईच्या साक्षीनं आज आपण दोन संकल्प सोडायचे आहेत ते म्हणजे- संकल्प क्रमांक एक- कुठलाही निर्णय घेताना आपल्या अंतर्मनाचा निर्णय प्रत्यक्ष कृतीत आणणे, संकल्प क्रमांक दोन आपल्या समोरच्या व्यक्तीने केलेल्या सत्कर्माची मनापासून प्रशंसा आणि कौतुक करणे. या मनोगता बरोबरच डॉक्टरांनी जवळजवळ एक महिनाभर चालणाऱ्या या काकडआरती आणि भजन कीर्तन प्रवचन आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्व अभिनंदन केले आणि आभार मानलेत. प्रदीप देसाईंनी विविध दृष्टांतातून उपस्थित भाविकांना कर्म सिद्धांताचे बाळकडूच देऊन महत्त्व पटवून दिले. रोट्रॅक क्लबचे अध्यक्ष हर्षद झवेरीनी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हा सर्वांना या काकड आरतीचा पवित्र प्रसन्न आनंद अनुभवण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी रोटरी सभासदांतर्फे कृतज्ञता व्यक्त केली. तसेच या समारंभात सामाजिक कार्यकर्ते सीताराम कोळेकर यांनाही सन्मानीत करण्यात आले. आरती पश्चात दिला जाणारा महाप्रसाद रोट्रॅक क्लबच्या वतीने देण्यात आला. काकड आरतीचे मानकरी आणि उपस्थित सर्व भक्तांचे श्री रामभाऊ माने यांनी मनःपूर्वक आभार मानलेत. या देवस्थानची समर्पित भावनेने काळजी घेणाऱ्या श्री रामभाऊ माने सरांशी औपचारिक चर्चा करताना डॉक्टर भंडारींनी हे देवस्थान आणि त्या भोवतालचा परिसर हा सातत्याने अत्यंत प्रसन्न,पवित्र स्वच्छ ठेवला जातो हे मी अनेक वर्षे बघत आलो आहे. एवढेच नव्हे तर वर्षभर विविध धार्मिक सामाजिक यशस्वी उपक्रम हे देवस्थानकडून राबविले जातात असे डॉक्टर नी सांगितले. या मागची प्रेरणा आणि प्रयत्न या संदर्भात जाणून घेण्याची मनापासून इच्छा असते. या वेळी माने आपल्या ओघवत्या शैलीत म्हणाले नीलकंठनगर तळेगाव स्थित या विठ्ठल मंदिराची स्थापना १४ मे २०१५ ला करण्यात आली , ३ /४ कोल्हाटी समाजाच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्रभर लावणीचे कार्यक्रम करून तसेच मावळ तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील अनेक दानशूर व्यक्तींनी आणि भाविकांनी विविध वस्तूंच्या रुपात, आर्थिक स्वरूपात मदतीनेच ह्या अत्यंत भव्यदिव्य मंदिराची उभारणी करण्यात आली . २०१७ पासून हे मंदिर सर्व तळेगांव वासीयांचे झाले आहे . तळेगावातील सर्व समाजातील पुरुष,महिला भाविक- पहाटे पासून आपलं मंदिर आहे असे समजून नित्यनियमाने काकड आरतीस येत असतात. विशेष म्हणजे २०१७ पासून गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर आरतीचा मान मनोभावे स्वीकारतात, एवढेच नव्हे तर मंदिराला महिन्याभराच्या काकडआरती सोहळ्यास स्वेच्छेने फुल ना फुलाच्या पाकळीच्या स्वरूपात दरवर्षी या काकड आरती कालावधीत भाविकांकडून मदतही केली जाते. या मंदिरात दररोज सकाळ- संध्याकाळ सतत ३६५ दिवस आरती केली जाते. आषाढी एकादशी ,कृष्ण जन्मांष्टमी सोहोळा ,तसेच १४ मे २०१५ चा वर्धापन दिन सोहळा हे सर्व सोहळे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मंदिराचे खरे पाईक हे कै. ज्ञानेश्वर माऊली किसनराव कुडाळकर आहेत! मंदिराचे सर्व व्यवस्थापन त्यांच्या पत्नी श्रीमती. रामेश्वर कुडाळकर या पहात असून त्यांनी रेणुका महिला भजनी मंडळाची स्थापना केली असून, त्यांना श्रीमती सिंधू नीलकंठ, मल्हारी नीलकंठ, लता कुडाळकर, संगीता लाखे, अर्चना जावळेकर,अल्काताई लाखे, विनायक कुडाळकर इत्यादी नेहमी सर्व सांप्रदायिक कार्यात सहकार्य करीत असतात. विशेष म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर व रेणुका महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी, त्यांचे सांप्रदायिक कार्यामुळे आपल्या तळेगावलाच नव्हे तर मावळ तालुक्याला आपलेसे केलेले आहे त्यामुळे आरती कोणीही भाविक चुकवत नाही, हीच त्यांच्या सांमप्रदायिक कार्याची पावती आहे. महिन्याभराच्या काकड आरतीच्या कालावधीत मंदिरातील प्रसन्न वातावरणामुळे सर्व भाविक भक्तीरसात चिंब चिंब भिजून जातात अशा अत्यंत भावनाशील शब्दात माने यांनी आपल्या देवस्थानच्या गौरव केला .




