लोणावळातील पर्यटन स्थळी कोणते नियम लागू असतील? वेळ काय असेल? उपविभागीय दंडाधिकारी यांचे आजपासून आदेश लागू



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,मावळ तालुक्यामध्ये दिनांक ३०/०६/२०२४ रोजी भूशी धरणाच्या वरच्या बाजूला आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पर्यटकांपैकी एकाच कुटुंबातील ५ जणांचा पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला आहे,मावळ तालुक्यातील सहारा ब्रिज, सहारा ब्रिज समोरील ३ छोटे धबधबे, भूशी डॅम, भूशी डंग येथील रेल्वे विभागाच्या गेस्ट हाऊस वरचा भाग, भूशी डेंग येथील वेस्ट वेइरच्या डाव्या बाजूचा वरचा भाग, टायगर पॉइंट, लायन्स पॉईट, शिवलिंग पॉइंट इत्यादी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, या गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील काही धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक आहे, मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांनी जबाबदारीयुक्त पर्यटन राबविणे आवश्यक असल्याच्या सुचना दिल्या आहेत.त्याला अनुसरून उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ- मुळशी,उपविभाग चे सुरेंद्र नवले, यांनी उपविभाग पुणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी दिनांक ०२/०७/२०२४ पासून ते दिनांक ३१/०८/२०२४ रोजीचे रात्री बारा वाजेपर्यंत खालील ठिकाणी जाण्यासाठी ठिकाणनिहाय पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.१. सहारा पुलावर वाहने पाकीग करण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.२. सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोटया धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.३. भूशी धरणाच्या रेल्वेच्या गेस्ट हाऊस पासून वरच्या बाजूला जाण्यासाठी गेस्ट हाऊस पासून पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.४. भूशी धरणाच्या west weir च्या डाव्या बाजूने वन विभागच्या जागेतून वरच्या बाजूच्या धबधब्याकडे जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.५. लायन्स पॉईट / टायगर पॉइंट शिवलिंग पॉईट येथे सायंकाळी ६.०० वाजलेपासून सकाळी ६.०० वाजेपर्यंत पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.सदर आदेशाची पोलिस विभाग, वन विभाग, नगर पालिका रेल्वे विभाग इत्यादीनी संयुक्तरित्या अंमलबजावणी करावी, रेल्वे विभागाने गेस्ट हाऊसच्या बाजूने वर जाणाऱ्या रस्त्यावर बेरेकेटोंग ची तात्काळ व्यवस्था करावी. लायन्स पॉईट, टायगर पॉईट, शिवलिंग पॉईट या ठिकाणी वन विभागाने सायंकाळी ६.०० ते सकाळी ६.०० या कालावधीत कायमस्वरूपी वनपाल नियुक्त करण्याची व्यवस्था करावी.वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती पर्यटक हे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील. असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीयअधिकारी मावळ- मुळशी चे सुरेंद्र नवले यांनी दिले आहेत.




