महाराष्ट्रातील सारथी,बार्टी व महाज्योती या संस्थेच्या वतीने संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ति न मिळाल्याने फूलेवाड़ा ते मंत्रालय लॉन्गमार्च



मावळ मराठा न्यूज़ :- लोणावला,अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, ओबीसी, मराठा व अल्पसंख्याक विद्यार्थी यांचा स्थगित केलेला लाँग मार्च पुन्हा सुरु करण्यात आला. महाराष्ट्रातील सारथी, बार्टी व महाज्योती या संस्थेतील २०२२ व २०२३ या वर्षातील संशोधक विद्यार्थ्यांना अधीछात्रवृत्ति न मिळाल्याने व शासन स्तरावर विद्यार्थ्यांची दखल घेतली न गेल्याने महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी हताश झाले होते. पीएचडी करिता नोंदणी होऊन दोन वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन सुद्धा २०२२ व २०२३ या वर्षातील विद्यार्थ्यांना फेलोशिप न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. संशोधक विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान विचारात घेता शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचविण्याकरिता या संशोधक विद्यार्थ्यांनी दिनांक २४ जून २०२४ रोजी पुण्यातील फुलेवाडा ते मंत्रालय, मुंबई असा लाँग मार्च आयोजित केला होता. या लाँग मार्चमध्ये २०२२ व २०२३ वर्षातील बार्टी, सारथी, व महाज्योती या संस्थेकडे अर्ज करणाऱ्या व पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून फेलोशिप मिळावी ही प्रमुख मागणी त्यांची आहे . विद्यार्थ्यांच्या लाँग मार्चची दखल घेत दिनांक २५ जून २०२४ रोजी मंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचा व मुख्यमंत्री यांच्याशी त्वरित बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपला लाँग मार्च सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. दिनांक २५ जून २०२४ रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री यांची विद्यार्थी प्रतिनिधींची चर्चा झाली. या चर्चेमध्ये संशोधक विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर आणण्याचे आदेश दिले होते विद्यार्थी आज अखेर सदर प्रस्ताव मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये येण्याची प्रतीक्षा करीत आहेत.मंत्रिमंडळ बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तावास दिवसेंदिवस विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे बार्टी, सारथी, व महाज्योती संस्थेतील विद्यार्थ्यांनी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा नव्याने स्थगित केलेल्या ठिकाणापासून म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून दिनांक १२ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रवेशद्वार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून सुरू केले आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मजूर अशा कुटुंबातून संशोधन क्षेत्रात सरकारच्या फेलोशिपच्या विश्वासाने प्रवेश घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना मोठ्या शैक्षणिक नुकसान व मानसिक तणावातून जावे लागत आहे .सदर बार्टी, सारथी, व महाज्योती संस्थेतील संशोधक विद्यार्थी यांचे लॉन्गमार्च आज लोणावळ्यात आल्यावर त्यानी छत्रपति शिवाजी महाराज, डॉ बाबासाहब आंबेडकर, ज्योतिबा फुले आदि राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन आपल्या व्यथा आणि त्यामुळे होणारे आर्थिक,सामाजिक नुकसान याबद्द्ल पत्रकारांशी संवाद साधला यावेळी लॉन्ग मार्च मधील संशोधक विद्यार्थ्यांचे हमाल पंचायत चे राजाराम साबले आणि चळवळीतील प्रसाद बागवे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. यावेळी सिमा वानखेड़े , तनुजा पंडित , नमिता खरात, तैयब्बा मुलानी, अजय गांगुर्डे सद्दाम मुजावर, अविनाश गुरव , पुंडलिक गच्चे, आकाश इंगोले, रोहीत परिट, कैलास गायकवाड.आदि आन्दोलन कर्ते उपस्थित होते.




