आषाढी वारी ; झळझळीत सोनसळा,कळस दिसतो सोज्वळा ||



मावळ मराठा न्युज -विठ्ठल भक्तांची भक्तीच जगावेगळी.लाखोंच्या संख्येने ज्याच्या दर्शनासाठी काहीशे किलोमीटर चालत जातात त्या विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन त्यातील फक्त ५ ते १० टक्के लोकांनाच करणे शक्य होते,मिळते.बाकीचे ८०/९० टक्के भक्त पंढरपूर घ्या वेशीत पोहचले की त्यांना पांडुरंगाला भेटल्याचा आनंद होतो.मग मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले की ते धन्य होतात आणि एवढ्या गर्दीत जर चंद्रभागेत स्नान करता आले तर मग यांच्यासाठी ते गंगास्नानच.आहे की नाही जगावेगळे विठ्ठल भक्त.याची कारणमिमांसा केली तर तुम्हांला समजेल की इथे वारीत चालताना,भजन कीर्तन करताना पदोपदी प्रत्यक्ष विठ्ठल आपल्याबरोबरच आहे याची अनुभुती,प्रचीती त्यांना वारंवार मिळत असते.बघा ना,फक्त विचार केला तरी डोकं गरगरायला लागतं.लाखो लोक, कोणत्याही प्रकारची नियोजीत सुख सुविधा नाही,प्रवासाची साधनं,मुक्कामाची बंदिस्त सोय..काही काही नाही .प्रत्यक्ष पंढरपूर नगरीचा आकाराच्या तुलनेत आवाका आहे का एवढ्या प्रचंड गर्दीला सामावून घेण्याचा?केवढा प्रचंड ताण येत असेल यंत्रणेवर.पण कुठेही अनुचित प्रकार नाही,गैरसोयीची तक्रार नाही, चेहर्यावर नाराजीचा मागमूस पण दिसणार नाही या कशाचाही……कुठुन येतं हे सगळं? एवढं करूनही फक्त कळस दर्शन करून हे आनंदी ….बघा ना फोटोत चेहरा कसा उजळलाय ते…. जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त विठ्ठल भक्तचं हे करू शकतात….. म्हणून वारंवार म्हणावसं वाटतं…. धन्य ती वारी… धन्य ते वारकरी आणि धन्य तो लाखोंच्या संख्येत सगळ्यांना एकाच वेळी समाधान देणारा परब्रह्म परमात्मा पांडुरंग




