रसिकांचे लाडके अण्णा उर्फ अनिल धर्माधिकारी भावपूर्ण श्रद्धांजली – ला. डॉ. शालिग्राम भंडारी

मावळ मराठा न्युज :-तळेगाव, तळेगावात अनेक झाकली माणक आहेत त्यापैकीच सर्वांचे लाडके अण्णा म्हणजेच सर्वसाची व्यक्तिमत्व अनिल धर्माधिकारी एक ऑगस्ट १९५६ चा अण्णांचा जन्म आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या सामान्य कुटुंबात झाला! कॅन्सरग्रस्त वडील-आई आणि पाच भावंड! तुटपुंज्या उत्पन्नात महाविद्यालयीन शिक्षण कसं होणार म्हणून अण्णांनी नाईलाजाने आय टीआय ला प्रवेश घेतला ! त्या शिक्षणावर रावळगाव फॅक्टरीत अण्णांनी पहिली नोकरी कुटुंबाला आर्थिक आधार म्हणून आनंदाने स्वीकारली! त्याच अनुभवाच्या शिदोरीवर १९८० साली तळेगावातील एन एच इ सी कंपनीत रुजू होऊन खऱ्या अर्थाने अण्णा तळेगावकर झालेत कंपनीतील मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या विखुरलेल्या कामगारांना एकत्र करणे! त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकांशी निस्वार्थ वृत्तीने संपर्क ठेवून कामगारांना न्याय मिळवून देणे यामुळे ते अल्पकाळातच कामगारांच्या गळ्यातले ताईत झालेत! जवळजवळ १९ , २० वर्षांपूर्वी अण्णांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर स्वर्गीय महंमद रफी फॅन क्लबची स्थापना केली. त्यामुळे तळेगावातील विविध रसिकांशी आणि संस्थांशी अण्णांचा गाढ परिचय झाला! दरवर्षी नाविन्यपूर्ण सूत्रसंचालना साठी अण्णांना अहोरात्र अभ्यास करावा लागायचा याच भक्कम पायावर अण्णा महाराष्ट्रातील उत्कृष्ट सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ आणि राष्ट्रीय पातळीवरील अमीन सयानींच्या पंक्तीत जाऊन केव्हा बसलेत हे त्यांनाही कळले नाही! कोणत्याही- मग तो राजकीय असो- सामाजिक असो वैयक्तिक लग्न समारंभ वा वास्तुशांती असो अशा विविध समारंभाला एका विशिष्ट उंचीवर नेण्याची क्षमता असणार अण्णांचं उत्कृष्ट सूत्रसंचालन असायचं! त्यामुळेच साहित्य कला संस्कृतीचं आगर असणाऱ्या तळेगावातील अनेक संस्थांच्या बरोबरच- लायन्स रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी त्यांचं अतूट नातं विणलं गेलं! आज अण्णा आपल्यातून अचानक निघून गेले असले तरी- त्यांच्या आठवणी मात्र माझ्यासारख्याच अनेक रसिकांनी आपल्या मनाच्या शिंपल्यात मोत्यासारख्या निश्चितच जपून ठेवल्या आहेत! देठही पक्का- वेलही पक्की असल्याने त्यांच्या संसार वेलीवर चिरंजीव अमोल आणि सागर अशी गोड टवटवीत फळ उमललीत- बहरलीत आणि वृद्धिंगत झालीत! एवढेच नव्हेतर- अण्णा आणि अंजली वहिनींनी- जन्मदात्यांची श्रावण बाळासारखी सेवा करणारी सेवा-वत्तीची कवचकुंडल मुलांबरोबरच आपल्या सुनांनाही बहाल केलीत! शेवटी जगाचा निरोप घेताना- तक्रार नाही- खंत नाही- पूर्तीसाठी प्रवास असतो! कधीतरी मिटण्यासाठी काळजा मधला श्वास असतो!! हे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे शब्द त्यांनी प्रत्यक्ष साकार करून आपली इहलोकीची यात्रा केली!

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page