*”लाडकी विहीण योजना” प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद *








मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे दि. – कलापिनी कलामंडळाने आयोजित केलेल्या लाडकी विहीण योजना या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनमुराद आनंद लुटला. कलापिनी कला मंडळ या प्रेक्षक चळवळीचे हे ३९ वे वर्ष आहे. ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.नाटकाची कथा विनोदी आणि कौटुंबिक आशयाने परिपूर्ण असून समाजातील नातेसंबंध, गैरसमज आणि त्यातून उलगडणारे वास्तव यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले.स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे केंडे, सिद्धी घैसास, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव, आणि निर्मिती सावंत यांनी केलेल्या दमदार अभिनयाने, नेटक्या दिग्दर्शनाने आणि प्रभावी संवादफेकीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. प्रसंगानुरूप विनोदामुळे सभागृहात हास्याची लकेर पसरली, तर भावनिक प्रसंगांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.अचूक कॉमिक टायमिंगमुळे प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरला.कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले होते. नाटकाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रेक्षकांनी कलापिनी कलामंडळाचे विशेष कौतुक केले.कलापिनी मुळेच आम्हाला अशी दर्जेदार आणि खिळवून ठेवणारी नाटकं बघायला मिळतात अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया होती. लाडकी विहीण योजनामधील प्रमुख भूमिका करणाऱ्या निर्मिती सावंत आणि निर्माते दिलीप जाधव यांचा सत्कार करण्यात आला . निर्मिती सावंत यांनी यापूर्वी तळेगावला केलेल्या चार चौघांच्या साक्षीनं या नाटकाची आणि तळेगावकरांनी केलेल्या हृद्य सत्काराची आठवण सांगितली आणि तळेगावकरांच्या सतत वाढणाऱ्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.रूपाली ठाकूरदेसाई यांनी निवेदन केले. कलापिनी कलामंडळ प्रमुख चेतन शहा, विनायक भालेराव, हेमंत झेंडे, अशोक बकरे, अंजली सहस्रबुद्धे आदींनी संयोजन केले.



