मावळतील मायबाप जनतेला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होता? आमदार सुनील शेळके



मावळ मराठा न्युज :-तळेगाव दाभाडे : माझ्या विरोधात एकवटलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सांगावे, कोरोना महामारी मध्ये जेव्हा मावळ तालुक्यातील मायबाप जनतेला आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही कोठे होता असा प्रश्न मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला आहे. शेळके म्हणाले, केवळ एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन एकत्र येत मावळ तालुक्यातील नेते मंडळींनी स्वतःच्या स्वार्थाचे व खुनशी राजकारण करत तालुक्यातील जनतेला खोटे नाटे सांगण्याचे उद्योग चालू केले आहेत. ज्या रस्त्याने ते जात आहेत तो रस्ता देखील मागील पाच वर्षांमध्ये झालेला आहे. ज्या पुलावरून ते जात आहेत ते पूल देखील मागील पाच वर्षांमध्ये उभे राहिलेले आहेत. २०१९ साली मावळच्या जनतेने मला विश्वासाने निवडून दिले, त्यांच्या विश्वासाला पात्र होत पाच वर्ष मी या मावळ तालुक्यामध्ये विकास कामे करत आहेत. अहोरात्र धावत आहे, म्हणूनच या तालुक्याच्या विकासासाठी 4158 कोटी रुपयांचा निधी मी मंजूर करून आणू शकलो. अनेक कामे सुरू झाली आहेत, काही कामे निवडणुकीनंतर सुरू होणार आहेत. अजूनही मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप काही करायचं आहे. अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प या तालुक्यामध्ये आले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी व या मावळ तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा मी जनतेकडे संधी मागत आहे. मी जनतेच्या सुखदुःखात सदैव उभा राहिलो म्हणून आज मावळ तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ज्यावेळी या जनतेला आपल्या आधाराची गरज होती तेव्हा मात्र तुम्ही जनतेला वाऱ्यावर सोडत मी व माझे कुटुंब म्हणत घरामध्ये बसले होते. हा संपूर्ण मावळ तालुका हेच माझे कुटुंब आहे असे म्हणत मी व माझे असंख्य कार्यकर्ते या मावळ वासियांच्या सेवेसाठी कोरोना सारख्या महामारीत रस्त्यावर उतरून काम करत होतो. ज्यांना आज तुम्ही पगारी म्हणून हिणवता तेच माझे जिवाभावाचे कार्यकर्ते त्यावेळी या मावळ तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत होते. दिवस रात्र सेवा केली म्हणून कोरोना सारखी महामारी मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव करू शकली नाही. ज्यांना कोणाला कोरोनाची लागण झाली त्यांना रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करून देणे, इंजेक्शन उपलब्ध करून देणे, कोविड सेंटर तयार करून त्या ठिकाणी त्यांचे कोरंटाईन करून घेणे, त्यांची जेवणाची सोय, त्यांचे समुपदेशन करणे ही कामे केली. मावळ तालुक्यामधील जवळपास ५६ हजार नागरिकांना अन्नधान्याचे कीट देण्याचे कार्य माझ्या या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी केले. नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते त्यांना घरोघरी भाजीपाला देण्याचे काम देखील माझ्या या कार्यकर्त्यांनी केले. त्यावेळी आज गावोगावी फिरणारे नेते कोठे होते, त्यांनी जनतेसाठी काय केले हा प्रश्न निश्चितच मावळ तालुक्यातील जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. २०१९ पूर्वी दहा वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी या मावळ तालुक्याच्या विकासासाठी काय केले ते त्यांनी या प्रचारादरम्यान सांगावे. मात्र सांगण्यासारखे काही नसल्याने केवळ सुनील शेळके यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे टीका टीपणी करणे हाच एक कलमी कार्यक्रम विरोधकांकडून राबविला जात आहे. २०१६ सालापासून मी या मावळ तालुक्यामध्ये फिरत असताना तालुक्यातील रस्ते, पाणी या समस्या मला दिसत होत्या. त्या सोडवण्यासाठी मी त्याकाळी वैयक्तिक स्वरूपात प्रयत्न केले मात्र त्याला ते प्रश्न कायम स्वरूपी सोडवायचे असतील तर सत्ता असणे गरजेचे आहे. याकरिता २०१९ ची निवडणूक लढवली व निवडून आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये निधी देत त्या त्या भागातील समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. मावळ तालुक्यामधील रस्ते असतील, जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याच्या समस्या असतील, या सोडवण्याचे काम केले. तालुक्यात दोन उपजिल्हा रुग्णालये उभी केली. सर्व शासकीय कार्यालये उभी रहात आहेत. जनतेला येत्या काळात वडगाव येथे आल्यावर एकाच ठिकाणी सर्व शासकीय सुविधा मिळणार आहेत. तुमच्याकडे सत्ता होती तुम्ही जनतेसाठी हे का केले नाही. मी हे करत असताना कोठेही श्रेय न घेता त्या त्या भागातील जेष्ठ व्यक्ती असतील महिला असतील यांच्या हस्ते त्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केली. हे सर्व माझ्या मावळ तालुक्यातील जनतेला माहीत आहे. मात्र काही स्वार्थी नेते मंडळी तालुक्यात मला काही भेटले नाही म्हणून विविध भागात जाऊन सर्वसामान्य नागरिकांची माथी भडकवण्याची कामे करत आहेत. मात्र मी माझ्या मतदार बंधू भगिनी व माता-भगिनींना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये मावळ तालुक्याच्या विकासाला आपण मत द्या, मावळ तालुक्याचा विकास थांबवण्याचे काम या विरोधकांकडून सुरू आहे त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.




