“सीमेवरील जवान हे भारतमातेचे सच्चे उपासक”श्री स्वामीराज जनकल्याण केंद्राच्या कार्यक्रमात रामदास कामत यांचे प्रतिपादन



मावळ मराठा न्युज – लोणावळा,”आज आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत कारण भारत मातेचे सच्चे उपासक तिथे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून दक्ष असतात.” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि एकपात्री कलावंत रामदास कृष्णा कामत यांनी केले. नांगरगाव, तपोभूमि येथील श्री स्वामीराज जनकल्याण केंद्राने त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त आयोजित केलेल्या “आझादी की जंग, फिल्मों के संग” या युद्धपटांवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री स्वामीराज जनकल्याण केंद्राचे सचिव अभय वैद्य यांनी कार्यक्रमाची संकल्पना सांगितली आणि सादरकर्ते रामदास कामत यांचा परिचय करुन दिला.’सर्वच चित्रपट हे मनोरंजनासाठी नसतात. खासकरून इतिहासावर आणि युद्धांवर आधारित चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी न पाहता त्यामागचा इतिहास जाणून घेण्यासाठी एक अभ्यास म्हणून पहा.’ असे मत यावेळी कामत ह्यांनी व्यक्त केले. ‘चित्रपट हे समाज प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम असून त्याचा जनमानसावर नक्कीच प्रभाव पडतो. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा आंदोलकांना स्फुरण देण्याचे, त्यांच्यात देशप्रेमाचा अंगार चेतवण्याचे महत्वपूर्ण कार्य चित्रपटांनी अतिशय प्रभावीपणे केले आहे’ असे ते पुढे म्हणाले. अलीकडे प्रेक्षकांच्या अभिरुचिवर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले कि लष्कर प्रमुख ते फील्ड मार्शल पदापर्यंत पोहोचलेल्या आणि भारत पाकिस्तान युद्धात अतिशय मोलाची कामगिरी पार पाडलेल्या पद्मविभूषण सर माणेक शा यांच्या चरित्रावर आधारित असलेल्या सॅम बहादूर ह्या चित्रपटासाठी प्रेक्षकांची वाट पहावी लागते तर केवळ विकृती आणि हिंसाचारावर आधारित अॅनिमल हा चित्रपट हजार करोड रुपयांचा धंदा करतो हे फार मोठे दुर्दैव आहे.१९४३ साली म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘किस्मत’ या चित्रपटातील ‘आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा हैं, दूर हटो ये दुनिया वालों हिंदुस्तान हमारा हैं’ ह्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शहीद, हकीकत, हिंदुस्तान की कसम, बॉर्डर, एल ओ सी कारगिल, गाझी अटॅक, आणि ऊरी-द- सर्जिकल स्ट्राइक अशा विविध युद्धपटांमागचा इतिहास रंजकपणे सांगत कामत यांनी युदधाशी संबंधित “ऑपरेशन कॅक्टस लिली”, “लोंगेवाला युद्ध”, गाझी आक्रमणाच्या वेळी नौदलाने आखलेली युद्धनीती ह्यावर महत्वपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी कामत ह्यांनी प्रेक्षकांना जे आवाहन केले त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे मानधन आणि आवाहन करुन आलेली रक्कम मिळून जवळ जवळ अठरा हजार रुपयांचा निधी उभा राहिला जो आर्मी वेलफेअर फंडाला देण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाला रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाला माजी नौदल अधिकारी महेश थत्ते, १९७१ च्या युद्धात सहभाग असलेले माजी सैनिक प्रकाश महाडीक आणि निवृत्त नौदल अधिकारी देविदास हस्ती आणि निवृत्त ब्लॅक कॅट कमांडो शरद विचारे इत्यादि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या सेवेतील चित्त थरारक अनुभव सांगून श्रोत्यांना थक्क केले. कार्यक्रम सर्वतोपरी यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी महादेव टिकम, रोहिदास कोरगावकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण राष्ट्रगीताने झाली.




