राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत लोणावळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे एकदिवसीय शिबीर संपन्न



मावळ मराठा न्युज -मळवली, Not me…But you…ह्या संस्काराचे बीज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे, “कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या” (Lonavala College) राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एकदिवसीय शिबिराचे आयोजन मळवली येथील शिक्षणग्राम येथे आयोजित करण्यात आले होते.आज शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनाथ आणि निराधार मुला-मुलींसाठी काम करणाऱ्या देवलेगावाजवळील शिक्षणग्राम संस्थेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकदिवसीय स्वच्छता शिबिरात सहभाग घेतला. सकाळी लवकर संस्थेत पोहचून संस्थेच्या परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली आणि दुपारच्या प्रहारात संस्थेच्या जवळील ध्यानकेंद्रात विद्यार्थ्यांना ध्यानाचे प्रात्यक्षिक देत ध्यानाचे महत्व पटवून देण्यात आले. संध्याकाळी शिक्षणग्राम संस्थेमध्ये समारोपाच्या कार्यक्रमात दुर्गा ससाणे ह्या विद्यार्थ्यीनी दिवसभराच्या कामाचा आढावा घेत आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे प्रमुख सौ. मून मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संस्थेचा इतिहास आणि संस्थेसमोरील आव्हाने सांगितली. डॉ. नरेंद्र देशमुख यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या आव्हानांना सामोरे जाताना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य नेहमीच संस्थेसोबत राहील याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. धनराज पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करत संस्थेने दिलेल्या सहकार्याबाबत ऋण व्यक्त केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणग्राम येथील विद्यार्थ्यांना गोड पदार्थ, चॉकलेट, कपडे आणि शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. सदर शिबिरासाठी प्रा. संजय साळुंके, प्रा. रोहन वर्तक, प्रा. रुपाली गवळी, प्रा. रघुनंदन मोहिते यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर शिबीराला प्रा. अॅनी वर्गिस (प्रमुख कनिष्ठ महाविद्यालय), सौ पौर्णिमा गायकवाड आणि श्री अनिकेत ढाकोळ यांनी उपस्थिती लावली.




