राजस्थान येथील खंद्रा हनुमान येथे २३ वा भक्ती महोत्सव उत्साहात साजरा





मावळ मराठा न्युज-राजस्थान,राजस्थान येथील पाली जिल्ह्यात असलेल्या खंद्रा मारुती मंदिरात २२ जानेवारी रोजी २३ वा ब्रम्ह महोत्सव/ भक्ती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजस्थान महाराष्ट्र व गुजरात या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या महोत्सवात सहभागी झाले होते. महाराष्ट्र मधील संत परंपरेचे शिरोमणी असलेले जगद्गुरु तुकोबा व माऊली ज्ञानोबा यांच्या नामघोषाने अभंग याने हा परिसर भक्तिमय झाला होता. लोणावळ्यातील हभप श्रीमंत रमेशसिंहजी देव शंकर व्यास यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागील २३ वर्ष हा महोत्सव मोठ्या भक्ती भावाने सुरू आहे. यावर्षी देखील लोणावळा, मावळ तालुका तसेच देहू – आळंदी भागातील १४१ भाविक भक्त सहभागी झाले होते. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तसेच परिसरातील १६ ते १७ गावातील नागरिकांची महाप्रसादाची व्यवस्था येथे करण्यात आली होती. राजस्थान येथील पाली जिल्ह्यात असलेले खंद्रा हे गाव देवभूमी म्हणून ओळखले जाते. या परिसरात विविध मंदिरे आहेत. ब्रम्हस्वरूप सद्गुरुदेव श्री श्री १००८ देवमुनिजी महाराज यांनी या ठिकाणी तब्बल ८४ वर्ष तपश्चर्या केली. त्यापैकी ४० वर्ष अन्न देखील ग्रहण केले नाही. मुनिजी तपश्चर्या करत असताना त्यांना साक्षात्कार झाला व त्यांनी आता जेथे खनद्रा मारुतीचे मंदिर आहे त्याठिकाणी खोदकाम केले असता तेथे आताची खनद्रा मारुतीची मूर्ती जमिनीखाली दिसून आली. ती मूर्ती आज देखील आहे त्याच स्थिती मध्ये आहे. बाजूने मंदिर उभारण्यात आले आहे. साधारणतः ८०० वर्षा पूर्वी ही मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. सद्गुरू मूनिजी यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर सदर मंदिराच्या समोर त्यांचे पवित्र असे मंदिर श्रीमंत रमेशसिंहजी व्यास यांच्या माध्यमातून बांधण्यात आले आहे. त्या सद्गुरुंचा हा २३ वा ब्रम्ह महोत्सव /भक्ती महोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. मागील २३ वर्षापासून निरंतरपणे हा महोत्सव केला जातो. त्यामध्ये महाराष्ट्रातून अनेक वारकरी सहभागी होतात. व्यास यांच्या माध्यमातून हे हरिभक्त याठिकाणी येत असतात. महोत्सवात सकाळी ब्रम्ह आरती, महाआरती, होम हवन अनुष्ठान, त्यानंतर ह भ प रमेश सिंह व्यास यांनी उपस्थितांना संबोधित करत या महोत्सव विषयी माहिती दिली तदनंतर संपूर्ण गावांमध्ये सद्गुरु देवमुनीजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी संगीतमय सुंदर कांड, फटाक्यांची आताशबाजी, दिपयज्ञ व भजन संध्या याचे आयोजन करण्यात आले होते.