“सामन्यातील क्षण आणि विजयाचा आनंद”




मावळ मराठा न्युज -(लेखक: हर्षल आल्पे)रविवारची दुपार आणि संध्याकाळ ही नेहमीसारखी आळसाने भरलेली. पण काल काहीतरी वेगळं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना, त्यात मिळालेला मोठा विजय, आणि त्या विजयाने आलेला उत्साह—हे सगळं अनुभवणं म्हणजे खरंच स्वर्गीय सुख होतं.सामना पाहायला मी अगदी तयार होतो. कोणत्याही निमित्ताने कुठे बाहेर जावं लागलं असतं, तरी मी ते ठामपणे टाळलं असतं. कारण क्रिकेट पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. हा खेळ आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. आपला संघ हरत असला किंवा जिंकत असला, आपण प्रेक्षक नसून त्या संघाचा भाग असल्यासारखं वाटतं. आणि काल तर भारतीय संघाचा विजय अनुभवल्याने तो आत्मीयतेचा अनुभव अजूनच गडद झाला.सामना सुरू होतानाजॉस बटलरने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो अनेकांना थोडासा अचंबित करणारा वाटला. भारताच्या शमी आणि हरषित राणाने चांगली सुरुवात केली असली तरी इंग्लंडने ३०५ धावांचा डोंगर उभा केला. त्यातही रवींद्र जडेजाचा टप्प्यावर अचूक मारा आणि शुभमन गिलचा अप्रतिम झेल हा पहिल्या डावाचा हायलाईट ठरला. गिलने घेतलेला हवेत सूर मारून मागे पडलेला झेल केवळ अप्रतिम होता. तो झेल पाहताना असं वाटलं की, संघासाठी काहीही करण्याची जिद्द गिलच्या मनात आहे.भारतीय फलंदाजीचा संघर्ष३०५ धावांचं लक्ष्य उभं राहिल्यावर थोडी भीती वाटत होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवातीला चांगली खेळी केली. रोहित शर्माने तर 90 चेंडूत ११९ धावांची खेळी करत पुन्हा एकदा कर्णधार म्हणून आपली ताकद सिद्ध केली. त्याने स्वतःच्या खेळातून आपल्याला सांगितलं, “सामना बघा आणि मजा घ्या.”विराट कोहली मात्र अजूनही फॉर्मशी संघर्ष करताना दिसतोय. त्याची फॉर्मशी गट्टी कधी होईल, याची सगळेच वाट पाहत आहेत. श्रेयस अय्यरने आपली सातत्यपूर्ण फलंदाजी दाखवत संघाचा विश्वास टिकवला. तर अक्षर पटेलने के.एल. राहुलच्या आधी फलंदाजी करून आपल्या चपळ खेळाने मोठी कामगिरी केली. शेवटी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलने सामना जिंकून दिला.विजयाचं महत्त्वया मालिकेतील विजय केवळ एक सामना जिंकणं नव्हतं, तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाला तयार करण्याचं पाऊल होतं. आता उरलेला सामना औपचारिक आहे, पण त्यातही खेळाडूंचा फॉर्म आणि टीम कॉम्बिनेशन पाहणं महत्त्वाचं ठरेल.कालचा विजय हा केवळ संघासाठी नाही, तर प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी खास होता. भारतीय संघाने दाखवलेला जिद्द, कर्णधार रोहित शर्माला सापडलेला सूर, आणि संपूर्ण संघाचा आत्मविश्वास हे सगळं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खूप महत्त्वाचं आहे.आता फक्त एकच इच्छा आहे—या आत्मविश्वासाला कायम ठेवा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंका!




