जय जय हनुमान भक्तांच्या हाकेला धावून येतात. संकट निवारण करतात



मावळ मराठा न्युज नेटवर्क -(बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर) यावर्षी १२ एप्रिल ला हनुमान जयंती आहे. प्रत्येक गावात वेशी बाहेर मारूती चे मंदिर असतेच. गावात लग्नासाठी येणारे वऱ्हाड तिथे उतरते. वर तोवर ब्रह्मचारी असतो. उत्तर भारतात हनुमान यांना खूप मानतात. हनुमान चालीसाचे रोज तिथे पठण केले जाते. चैत्र महिन्यात पौर्णिमेला हनुमान यांचा जन्म झाला. आपण रामायणात हनुमान यांना पवन आणि अंजनी यांचे पुत्र मानतो. एक कथा अशीही आहे की दशरथ राजाने केलेल्या यज्ञात अग्नी देवाने खिरी चा कुंभ राजाला दिला आणि सर्व राण्यांना सारखा प्रसाद त्वरित भक्षण करण्यास सांगितले. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना तीन भाग देण्यात आले. कैकेयी चे पात्र घारीने झेप घालून उचलले. ते समजताच कौसल्या, सुमित्रा यांनी आपल्या प्रसादाचा काही भाग कैकेयी ला दिला. कौसल्येस राम, सुमित्रेस लक्ष्मण तर कैकेयी ला भरत आणि शत्रुघ्न पुत्ररत्न झाले. घारीने प्रसाद पात्र खाली सोडले. अंजनी आपल्या आश्रमात तुळशीची पूजा करत होती. अर्ध्य देण्यासाठी हाताची ओंजळ पुढे केली तोच प्रसाद पात्र हातात पडले. देवाचा प्रसाद मानून ते सेवन केले. यामुळे अंजनी च्या पोटी हनुमान जन्मले. नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी हे हनुमानांचे जन्मस्थळ होय. आपल्या वेदपुराणांपासून मान्य असलेल्या सप्तचिरंजीवांपैकी रामभक्त हनुमान एक आहेत. शक्तीदाता म्हणून त्यांना बाल, किशोर,तरूण वर्ग पूजतो. तालीम, व्यायामशाळा मध्ये त्यांची तसबीर असते.बलोपासना करण्यासाठी केवळ हिंदू नव्हे तर मुस्लिम, ख्रिस्ती युवक देखील वीर हनुमान यांना मानतात. समर्थ रामदास यांनी युवकांना प्रेरित करण्यासाठी ११ मारुतींची स्थापना केली. चाफळचा वीर मारुती आणि प्रताप मारुती, माजगाव, शिंगणवाडी, उंब्रज, मसूर, शहापूर, शिराळे, बहे बोरगाव, मनपाडळे, पारगाव हे मारूती होत. सह्याद्री च्या डोंगर दऱ्यांमध्ये मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम यानिमित्ताने झाले. शिवाजी महाराजांना नेहमी समर्थ रामदासांनी योग्य सल्ले दिले. ब्रम्हांड पुराणानुसार मतिमान, श्रुतिमान, केतुमान, गतिमान, धृतिमान अशी त्यांची भावंडे आहेत. समुद्रावरून उड्डाण करत असताना हनुमानांचा जो घाम पडला त्याला मगरीने गिळले. हनुमान जरी ब्रम्हचारी होते तरी मगरीने घाम गिळल्यामुळे तिला जो मुलगा झाला त्याचे नाव मकरध्वज. हनुमान हे शास्त्रप्रवीण, राजनीतिज्ञ, शौर्य, बुद्धिमत्ता, ब्रह्मचर्य, रामभक्ती, वक्तृत्व इ. अलौकिक गुणांची मूर्ती. गदा हे त्यांचे मुख्य आयुध.राम, लक्ष्मण, सीता वनवासाकरता आले तेव्हा सुग्रीव यांच्या मंत्रिमंडळात हनुमान मंत्री होते. बालीचा वध केल्यानंतर हनुमान मदत करण्यासाठी त्यांच्याबरोबर निघाले. सीताशोध, अशोकवनविध्वंस, लंकादहन ही हनुमान यांची काही गौरवान्वित करणारी अचाट कृत्ये होत. संजीवनी बुटी आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. हनुमान, हनुमंत, मारूती, अंजनेय, पवनसूत, बजरंगबली,केसरीनंदन काहीही म्हणा ते भक्तांच्या हाकेला धावून येतात. संकट निवारण करतात.




