विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने एकनाथ उगले सन्मानित

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : १५ मे २०२५ थरमॅक्स लिमिटेड, चिंचवड मधील कामगार एकनाथ रमेश उगले यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ३६व्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२३ या सोहळ्यात विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करून कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते; तसेच राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार मनोज जामसुतकर, मनीषा कायंदे, प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त डाॅ. एच. पी. तुम्माडे, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.अध्यात्म, साहित्य, समाजकारण, पर्यावरण या क्षेत्रांत सक्रिय योगदान देणाऱ्या एकनाथ उगले यांनी ‘सुवर्णसुखाचा निर्झरू’ या ग्रंथाचे लेखन केले आहे. थरमॅक्स कामगार संघटनेत खजिनदार हे पद त्यांनी भूषविले असून आपल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवरून ते आध्यात्मिक आणि प्रबोधनात्मक व्हिडिओ प्रसारित करीत असतात. यापूर्वी उगले यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने पणजी, गोवा येथे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक दामोदर मावजो यांच्या हस्ते श्रमभूषण पुरस्कार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने श्रमप्रतिष्ठा पुरस्कार, बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सदरहू विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याप्रीत्यर्थ स्वकूळ साळी समाज, पिंपरी – चिंचवड, श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि आधार ज्येष्ठ नागरिक संघ यमुनानगर यांच्या वतीने उगले यांना सन्मानित करण्यात आले; तसेच माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page