कैवल्यधाम योग संस्थेमध्ये ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा,‘योगमय पोलीस’ व ‘Philosophy of Yoga’ पुस्तकांचे पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते प्रकाशन

मावळ मराठा न्यूज -लोणावळा,आयुष मंत्रालयाच्या ‘योग संगम’ उपक्रमाअंतर्गत आणि ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या प्रेरणादायी थीमनुसार, जागतिक कीर्ती प्राप्त कैवल्यधाम योग संस्थेमध्ये शनिवार, २१ जून २०२५ रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ .३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाईव्ह संदेशाने झाली. त्यानंतर साधक रामदास यांच्या शंखनादाने वातावरण प्रसन्न झाले. कोल्हापूर विभागाचे विशेष महानिरीक्षक (IG) श्री. सुनिल फुलारी (IPS) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला. यावेळी कैवल्यधामचे मानद सचिव आणि CEO श्री. सुबोध तिवारी, प्रो. रणजीत सिंग भोगल, ब्रिगेडियर सुहास धर्माधिकारी, ॲड. मेघना पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाळी ७ ते ८ दरम्यान कुडीलाल सक्सेरिया हॉल १ आणि २ मध्ये योगाभ्यास सत्र पार पडले. हे सत्र वरिष्ठ योग शिक्षक नीरज सिंग आणि योग शिक्षिका कुमारी पूर्वा सातकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. साधकांसोबतच नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी, लायन्स क्लब ऑफ लोणावळा प्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विशेष पुस्तकांचे प्रकाशनया योग दिनाचे औचित्य साधून, कैवल्यधाम योग महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शरदचंद्र भालेकर लिखित ‘योगमय पोलीस’ आणि डॉ. स्टुअर्ट रोझ व स्वामी महेशानंदजी लिखित ‘Philosophy of Yoga’ या पुस्तकांचे प्रकाशन सुनिल फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘योगमय पोलीस’ हे पुस्तक पोलीस कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी योगाच्या प्रभावी उपयोगावर केंद्रित असून, हे पोलीस दल व कैवल्यधाममधील दीर्घकालीन सहकार्याचे प्रतीक ठरणार आहे.सन्मान व प्रेरणादायी विचारकैवल्यधामतर्फे सुनिल फुलारी यांना शाल आणि ‘कॉफी टेबल बुक’ देऊन सन्मानित करण्यात आले. अलीकडेच त्यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५ ’ ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या भाषणात योगामुळे मिळणाऱ्या सकारात्मक उर्जेवर आणि तणावमुक्त जीवनशैलीच्या गरजेवर भर दिला. योग शिक्षक जितेंद्र सिंगला यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन श्री. सुबोध तिवारी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘ॐ पूर्णमदः’ या शांतिपाठाने झाली. नंतर सर्व उपस्थित मान्यवरांसाठी अल्पोपहार आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाच्या निमित्त आमच्या प्रशिक्षकांनी ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड, द ग्रेट ईस्टर्न अकॅडमी, नवल कॅडेट्स लोणावळा, एल अँड टी लर्निंग सेंटर, पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, आय एन एस शिवाजी, कैवल्य विद्यानिकेतन स्कूल, टाटा पॉवर हाऊस वलवन, खोपोली पॉवर हाऊस, भिरा पॉवर हाऊस, फरियास रिसॉर्ट लोणावळा या ठिकाणी योगा सामान्य प्रोटोकॉल प्रमाणे योगाचे प्रशिक्षण दिले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page